माळेगाव - बारामती-शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात कार्य़रत असलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामधील रोपवाटिकेला “थ्री स्टार” मानांकन प्राप्त झाल्याची माहिती आज पुढे आली. राष्ट्रीय बागवानी बोर्ड,गुरगाव (हरियाणा) यांच्या कडून थ्री स्टार मानांकन (सर्वोत्तम दर्जा) वरील भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील रोपवाटीकेला देण्यात आला. विशेषतः शारदानगरच्या रोपवाटीकेला `थ्री स्टार` मिळालेले मानांकन हे महाराष्ट्र पहिले, तर भारतात तिसरे नोंदविले गेले.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट-बारामती संचलित कृषि विज्ञान केंद्रमधील भाजीपाला गुणवत्ता केंद्र यशस्वीरित्या कार्य़रत आहे. या भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील रोपवाटिकेला राष्ट्रीय बागवानी बोर्ड, गुरगाव (हरियाणा) यांच्या कडून थ्री स्टार मानांकन (सर्वोत्तम दर्जा) देण्यात आले. हे मानांकन परीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय बागवानी बोर्ड, पुणे उपविभागाचे डॉ. ए.के.सिंग व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या बोर्डाकडून देशातील ७७१ रोपवाटिकांचे मानांकन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत देशात एकूण ३१ रोपवाटिकेमधून बारामतीच्या रोपवाटीकेस “थ्री स्टार” मानांकनाने सन्मानित करण्यात आली.
भाजीपाला गुणवत्ता केंद्रात डच टाईप अत्याधुनिक रोपवाटिकामध्ये कुशल कर्मचाऱ्यांमार्फत बारामतीची रोपवाटिका चालवली जाते. यामध्ये आधुनिक बेंच सिस्टीम, बी उगवण कक्ष, फॅन व पॅड टाईप चे पॉलीहाउस तसेच हार्डनिंग कक्ष यांचा समावेश आहे.
रोपवाटिकेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार चांगल्या दर्जाची रोपे बनवून दिली जातात. त्यामध्ये रोपे तयार करताना जर्मनीतून आयात केलेले मिडिया परलाईट व पिटमॉस वापरून रोपे तयार केली जातात. रोपवाटिकेमधील कोकोपीट हे `आरएचपी` प्रमाणित निर्जंतुकीकरण केलेले असते. रोपे तयार करत असताना आधुनिक बीज रोपण यंत्रणा वापरली जाते. तसेच खत व पाणी व्यवस्थापन हे रोबोटिक बूमच्या सहाय्याने केले जाते.
तसेच या रोपवाटिकामध्ये भाजीपाला रोपांमध्ये आधुनिक कलम तंत्रज्ञान वापरून रोपे तयार केली जातात. त्यामुळे रोपांमध्ये येणाऱ्या जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांना रोपांचे आयुष्य वाढून त्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. या केंद्रामार्फत मोफत रोपे विक्री पश्चात मार्गदर्शन केले जाते. तसेच भाजीपाला लागवड संदर्भाने विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जातात, ही बाब मानांकन परीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय बागवानी बोर्डाने विचारात घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त विष्णुपंत हिंगणे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.निलेश नलावडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.धीरज शिंदे यांनी मिळालेल्या मानांकनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. त्यामध्ये अभिनंदनास पात्र ठरलेले भाजीपाला रोपे निर्मिती केंद्राचे उद्यानविध्या विषय तज्ञ यशवंत जगदाळे, तुषार जाधव, विजय मदने यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.