Crime_Kidnap
Crime_Kidnap

बारामती : 5 कोटींसाठी डाळिंब व्यापाऱ्यांनी केलं मुलाला किडनॅप; चित्रपटात शोभेल असं थरारनाट्य

Published on

बारामती (पुणे) : पाच कोटींच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण करणा-या सहा जणांपैकी दोघांना बारामती शहर पोलिसांनी काही तासात शिताफिने ताब्यात घेतले. एखाद्या चित्रपटात शोभावे असे हे थरारनाट्य घडले. या थरारनाट्यामध्ये शहर पोलिसांच्या पथकाने सुनील लक्ष्मण दडस (रा. दुधेबावी, ता. फलटण) आणि गौरव साहेबराव शेटे (रा. वायसेवाडी, ता. कर्जत, जि. नगर) यांना अटक केली आहे. डाळिंबाच्या व्यापारातील आर्थिक तंगीनंतर झटपट श्रीमंत होण्यासाठी हे अपहरण झाल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर आणि पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

कृष्णराज धनाजी जाचक (वय 19, रा. बारामती) याचे शुक्रवारी रात्री (ता. 12) सहा जणांनी मारहाण करत अपहरण केले. सूर्यनगरीतील एका मैदानात मित्रांसोबत गेम खेळत बसलेल्या कृष्णराजला या अपहरणकर्त्यांनी गाडीत घालून पळवून नेले. काही मिनिटात झालेल्या या अपहरणनाट्याची माहिती पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांना मिळताच त्यांनी तातडीने स्वत: सूत्रे हाती घेत तपास सुरू केला. 

दुसरीकडे अपहरणकर्त्यांनी कृष्णराज याचे डोळे पट्टीने बांधून त्याला मारहाण सुरु ठेवली होती. त्याला ते माण तालुक्यातील मलवडीच्या दिशेने घेऊन गेली. मधल्या काळात कृष्णराजचे वडील धनाजी जाचक यांना पाच कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर मुलाच्या जीवाला मुकाल, अशी धमकीही अपहरणकर्त्यांनी दिली. आलेल्या फोन नंबरचा शोध घेत पोलिस अकरा तासात त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना गजाआड केले. 

नामदेव शिंदे यांच्यासह सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे आणि उमेश दंडिले, उपनिरिक्षक गणेश निंबाळकर, सहायक फौजदार संजय जगदाळे, शिवाजी निकम, रुपेश साळुंके, दादासाहेब डोईफोडे, तुषार चव्हाण, जितेंद्र शिंदे, दशरथ इंगोले, योगेश कुलकर्णी, ओंकार सिताप, सायबर सेलचे सुनील कोळी, चेतन पाटील यांनी ही कामगिरी केली. 

बारामतीतूनच टीप मिळाली...
बारामतीतील एकाने कृष्णराजबाबत टीप दिल्याचे समोर आले आहे, या शिवाय इतर सर्वच संशयितांची नावे निष्पन्न झाली असून पोलिस त्यांचा वेगाने शोध घेत आहेत. पाच मित्रांनी एकत्र येत रेकी करुन हे अपहरण घडविले. 

टीम वर्कने वाचला कृष्णराजचा जीव...
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक  मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे तिघेही रात्रभर या पोलिस पथकाच्या संपर्कात होते. मोबाईल लोकेशन शोधण्यापासून आवश्यक सर्व मदत पथकाला मिळण्यासाठी प्रत्येक हालचालीवर या तिन्ही वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष ठेवले. एखाद्या चित्रपटात शोभेल असेच हे थरारनाट्य होते. कृष्णराजच्या जिवाला धोका होऊ नये याला सर्वोच्च प्राधान्य देत ही कारवाई करत पोलिसांनी सहा पैकी दोघांना जेरबंद केले. पोलिस अधीक्षकांनी या पथकाला या कामगिरीबद्दल 15 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

जाचक कुटुंबियांनीही दाखविले धैर्य...
मुलाचे अपहरण झाल्यानंतर धनाजी जाचक आणि कुटुंबीयांनीही कमालीचे धैर्य दाखवित पोलिसांना सहकार्य केले, त्यामुळे कृष्णराज याची सुटका करणे अधिक सुलभ झाल्याचे मिलिंद मोहिते यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()