बारामती : शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या विचारात घेता, आगामी काळात बारामतीकरांना ऑक्सिजन बेड्सची संख्या कमी पडू नये, यासाठी रुई रुग्णालयाशेजारील नर्सिंग वसतिगृहामध्ये ऑक्सिजन असलेल्या शंभर बेड्सचे तात्पुरते रुग्णालय तयार करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी आज अजित पवार यांच्यापुढे या संदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. बारामतीत रुई ग्रामीण रुग्णालयाने गेल्या वर्षभराच्या काळात असंख्य रुग्णांवर विनामूल्य उपचार केले आहेत. याच ठिकाणी जर आणखी 100 ऑक्सिजन बेडसची क्षमता वाढली तर आर्थिकदृष्टया दुर्बल रुग्णांवर येथे विनामूल्य उपचार करणे शक्य होईल, या उद्देशाने किरण गुजर यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. लवकरच या बाबतच्या तांत्रिक बाबी पूर्ण करुन येथे ऑक्सिजन बेड्स तयार होण्यास प्रारंभ होणार आहे.
बारामतीत या पूर्वीच सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील 100 बेडसचे रुपांतर ऑक्सिजनच्या सुविधा असलेल्या बेडसमध्ये करण्यात आले आहे. आता रुई येथेही 100 बेड्सची ही सुविधा मिळणार असल्याने बारामतीत 200 ऑक्सिजनचे बेड्स विनामूल्य रुग्णांना काही दिवसातच उपलब्ध होतील. महिला ग्रामीण रुग्णालय लांब पडत असल्याने अनेक जण तेथे जाऊन लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याने शहरातील शारदा प्रांगणातील शाळेच्या काही खोल्या अधिग्रहीत करुन तेथे अतिदक्षता विभाग तात्पुरता कार्यान्वित करुन लसीकरण कार्यक्रमास प्रारंभ करावा, असाही प्रस्ताव गुजर यांनी दिला, त्यासही अजित पवार यांनी मान्यता दिली. शहरात सॅनिटायझेशन करण्यासाठी कृषी विभागाकडून ट्रॅक्टरची उपलब्धता होत नसल्याची बाबही या वेळेस पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही यंत्रणा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सर्वेक्षणाचा फरक दिसू लागला
एकीकडे अंशतः लॉकडाऊन व दुसरीकडे बारामती नगरपालिकेने घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण व त्या माध्यमातून केलेली जनजागृती या मुळे शहरातील आकडा काही प्रमाणात घटला आहे. बारामतीतील जवळपास 89 हजार नागरिकांचे नगरपालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केल्याचा परिणाम दिसू लागला आहे. सूर्यनगरीतील आकडाही घटू लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.