ग्रामीण भागातील मुलांनी शिकून सवरुन मोठे व्हावे, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनीही नावलौकीक प्राप्त करावा आणि कौटुंबिक प्रगती साधत अर्थकारणाला गती द्यावी या उद्देशाने स्थापन केलेली विद्या प्रतिष्ठान संस्था सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी या उद्देशाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 16 ऑक्टोबर 1972 रोजी स्थापन केलेल्या या संस्थेने बघता बघता पन्नास वर्षांचा टप्पा पार केला आहे. या संस्थेचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
बारामती पंचक्रोशीतील मुलांना इंग्रजी शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने शरद पवार यांनी विनोदकुमार गुजर, द.रा. उंडे, डॉ. एम.आर. शहा, अप्पासाहेब जाधव, खुशालभाऊ छाजेड अशा सहका-यांच्या मदतीने बाल विकास मंदीर शाळेची स्थापना केली. या नंतर संस्थेने सातत्याने नवनवीन शैक्षणिक संधीची दालने बारामतीकरांना खुली करुन दिली.
बारामती परिसरातील मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी पुण्यात 250 मुलांसाठी गोखले नगर येथे व 200 मुलींसाठी कर्वेनगर येथे स्वतंत्र व सुसज्ज असे वसतिगृह उभारण्यात आले. औद्योगिकरणानंतर शिक्षणाचे महत्व वाढणार ही बाब ओळखून एमआयडीसी परिसरात विद्या प्रतिष्ठान संकुलाची स्थापना केली गेली. आज या संकुलाचा विस्तार तब्बल 156 एकरांचा झाला आहे.
या संकुलात संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय, विविध माध्यमांच्या शाळा, पुणे विद्यापीठांशी संलग्नित सर्व प्रकारची महाविद्यालये, जैवतंत्रज्ञानाची संशोधन संस्था, सुसज्ज ग्रंथालये, अद्यावत व्यायाम शाळा, क्रीडांगणे, वसुंधरा रेडिओ वाहिनीचे केंद्र, एकाच वेळी अडीच हजार विद्यार्थी मावतील असे गदिमा सभागृह आहे. शरद पवार यांना मिळालेल्या भेटवस्तूंचे जनवस्तु संग्रहालय संकुलात असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असते.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव नीलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्यासह प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नांतून या संस्थेने राष्ट्रीय पातळीवर नावलौकीक प्राप्त केला आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संस्थेचा झेंडा साता समुद्रापार उंचावला आहे. अनेक विद्यार्थी आय.ए.एस. अधिकारी,न सैन्यदलातील अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, शास्त्रज्ञ, खेळाडू, कलाकार तसेच शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात भारतासह अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया येथे कार्यरत आहेत ही बाब संस्थेसाठी अभिमानास्पद आहे.
विद्या प्रतिष्ठान मध्ये 29 शाळा व महाविद्यालये असून या पैकी 17शाळा व 11 महाविद्यालये व एक संशोधन संस्था आहे. संस्थेच्या आवारात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंटर ऑफ एक्स्लेन्स सुवर्ण महोत्सवी वर्षात सुरू होत आहे.संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयात आज 30010 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत (13773 मुली, 16237 मुले), संस्थेत 1768 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. विविध शिक्षण अभ्यासक्रमांची दालने विद्यार्थ्यांसाठी खुली असून केजी ते पीजी पर्यंत विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेऊ शकतात.
विद्या प्रतिष्ठान संस्थेला नुकतीच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन्स, अशी मान्यता मिळाली आहे. संकुलातील विविध महाविद्यालयांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थाबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत ज्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना जागतिक दर्जाचे ज्ञान व संधी उपलब्ध होत आहेत.
संस्थेतील शिक्षक अहोरात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकाससाठी व त्यांच्यातील सुप्त गुण हेरून त्यांना योग्य दिशा व संधी देण्यासाठी झटत आहेत. अनेक शिक्षकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मानही प्राप्त झालेले आहेत.
- मिलिंद संगई, बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.