- कृष्णा गडदरे
पुणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी पुणे रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेली ‘बॅटरी ऑपरेटेड कार’च्या सेवेचे दर परवडत नसल्यामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे या सेवेचे दर कमी करण्याच्या प्रस्तावावर रेल्वे प्रशासनाने विचार सुरू केला आहे. प्रशिक्षित चालकांची कमतरता, यामुळेही ही सेवा बंद पडली आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ६ दरम्यान विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी, गरोदर आदी प्रवाशांच्या वाहतुकीसाठी विमानतळाच्या धर्तीवर बॅटरी ऑपरेटेड कार १ जून २०१९ पासून कार्यान्वित केली. त्यासाठी प्रती प्रवासी ४० रुपये आणि प्रती बॅग १० रुपये, असा दर निश्चित करण्यात आला. एका कारमधून चालकासह सहा प्रवाशांची वाहतूक होऊ शकते. इलेक्ट्रिक बॅटरवर चालणारे हे वाहन असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. मात्र, त्याचे दर जास्त असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
या बाबत प्रवासी विकास साळवे म्हणाले ‘‘ही सेवा चांगली आहे. मात्र, शुल्क कमी करावे लागेल. प्रत्येक प्रवाशासाठी ४० रुपये हे शुल्क जास्त वाटते. एवढे पैसे घेतले बॅगा तरी विनामूल्य घेतल्या पाहिजे. दर कमी केले तर, ज्यांना या सेवेची आवश्यकता आहे, असे अनेक प्रवासी ती वापरतील.’’
ज्येष्ठ नागरिक आनंद भिसे म्हणाले, ‘‘मला प्लॅटफॉर्मवर वयोमानामुळे वेगात चालणे शक्य नाही. त्यामुळे प्रवास करायचा असेल तर, मला किमान अर्धा तास लवकर स्टेशनवर यावे लागते. दर कमी झाले तर, बॅटरीवर चालणाऱ्या या कार माझ्यासाठी खरंच खूप उपयुक्त ठरतील.’’
या वाहनांची देखभाल करणाऱ्या बीव्हीजी कंपनीचे प्रतिनिधी म्हणाले, ‘‘आतापर्यंत आम्ही पुणे रेल्वे स्थानकातील दोन्ही कार सुरू होत्या. ही वाहने ताशी १० किलोमीटर वेगाने जातात. रेल्वेकडून भरती करण्यात आलेल्या वाहनचालकांनी योग्यप्रकारे काम न केल्यामुळे या कार बंद करण्यात आल्या आहेत. सध्या याचे व्यवस्थापन आमच्याकडे नाही.’’
रेल्वे प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर म्हणाले, ‘‘प्लॅटफॉर्मवर ही कार चालविण्यासाठी कुशल चालक गरजेचे आहेत. त्यांची कमतरता आहे आणि प्रवाशांच्याही अल्प प्रतिसादामुळे ही सेवा अडचणीत आली आहे.’’
रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, ‘‘बॅटरी कार ही प्रवासांसाठी आवश्यक सेवा आहे. किफायतशीर दरात ती उपलब्ध करणे रेल्वे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. या कार बंद करणे हा उपाय नाही.’’
पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले, “या बॅटरी कारचा विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना फायदा होत होता. प्लॅटफॉर्मची दुरुस्ती, सरकता जिना बसवणे व विद्युत यांत्रिकीकरणांची कामे करायची असल्याने कोरोना काळात ही सेवा बंद करण्यात आलेली आहे. ती लवकरच सुरू करू.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.