आंबेठाण : भामा आसखेड (ता.खेड) धरणातून आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून ३०८६ क्यूसेसने विसर्ग भामा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वाढत्या पावसाबरोबर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झपाट्याने होत असल्याने विसर्ग वाढविला जाऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असे आवाहन धरण प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.धरण सध्या ९१.३५ टक्के भरले आहे.
मागील वर्षी धरणातून २४ सप्टेंबरला पहिला विसर्ग सोडण्यात आला होता.तर चालू वर्षी आज ( दि.०४ ऑगस्ट ) पहिला विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चारही दरवाजातून विसर्ग सुरू आहे.यासाठी धरणाचे चार दरवाजे ३० सेंमीने वर उचलण्यात आले आहेत.गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणात ७९.७८ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.
खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या तुलनेत या वर्षी भामा आसखेड धरणातून उशिरा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.खेड तालुक्यातील कळमोडी आणि चासकमान धरणानंतर आता भामा आसखेड मधूनदेखील विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणे भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मागील दोन ते दिवसांपासून धरण परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण असून धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून ९३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सध्या धरणात एकूण पाणीसाठा ७.४८ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा ७.०१ टीएमसी इतका आहे. पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग कमीजास्त करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सहाय्यक अभियंता ( श्रेणी १ ) अश्विन पवार,शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख,कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.