भीमाशंकर अभयारण्याच्या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये या गावांचा समावेश

bhimashankar
bhimashankar
Updated on

शिनोली (पुणे) : भीमाशंकर अभयारण्याचा इको सेंसेटिव्ह झोन केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय यांनी जाहिर केला असून, यामध्ये पुणे, रायगड, ठाणे जिल्ह्यातील ४२ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

भीमाशंकर अभयारण्याचा इको सेंसेटिव्ह झोन जाहिर करण्याबाबत २५ जुलै २०१९ रोजी प्रारूप अधिसुचना जाहिर केली होती. या अधिसुचनेद्वारे इको सेंसेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट होत असलेल्या गावांचे आक्षेप व सुचना मागविण्यात आल्या होत्या. हा इको सेंसेटिव्ह झोन करू नये, अशा स्वरूपाचे लेखी म्हणणे ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन पाठविल्या होते. त्यानंतरही केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने ५ आॅगस्ट २०२० रोजी हा इको सेंसेटिव्ह झोन जाहिर केला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
पर्यावरणदृष्टया संवेदनशिल क्षेत्रामुळे या गावांमध्ये रासायनिक खतांचे कारखाने, मोठे विद्युत निर्मिती प्रकल्प, लाकूड कापण्याच्या मील, दगडाच्या खाणी, मोठे गृहनिर्माण प्रकल्प, करमणुकीच्या उद्देशाने बनविलेली उद्याने आणि राखीव मोकळ्या जागेचा व्यवसायिक, निवासी किंवा औद्योगिक उपक्रमांसाठी उपयोग केला जाऊ  शकणार नाही. तसेच, नविन हॉटेल किंवा रिसॉर्ट बांधण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. तसेच, प्लास्टिक कचरा, घन कचरा, जैव वैद्यकीय कचरा, ई-कचरा याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. वाहन प्रदुषण रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचे काटेकोर पालन केले जाईल. डोंगराच्या उतारांचे संरक्षण करण्यासाठी यावर कोणत्याही बांधकामाला परवानगी नसणार आहे. 

भीमाशंकर अभयारण्य पुणे, ठाणे व रायगड जिल्ह्यातील क्षेत्र मिळून १३०.७८ चौरस किलोमीटरमध्ये १६ सष्टेंबर १९८५ मध्ये अस्तित्वात आले. या अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आढळतो. तसेच बिबटया, सांबर, भेकर, हनुमान वानर, रानमांजर, खवले मांजर, मुंगूस, मोर, घुबड, शिकारा, हिरवे कबुतर अशा सस्तन प्राण्यांच्या २२ प्रजाती व  जवळजवळ २५ सरपटणारे प्राणी व उभयचारांच्या अनेक प्रजाती आढळतात. 

हे अभयारण्य पश्चिम घाटात येत असून, मानवी वस्ती व चालू असलेल्या विकासात्मक घडमोडींच्या अतिजवळ आगे. त्यामुळे या अभयारण्याला संरक्षणाची व अभारण्याच्या जवळ सुरू असलेल्या उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याच्या सुचना डॉ. के. कस्तुरीरंगन कमेटीने केल्या होत्या.  हे अभयारण्य पाऊस रोखण्यासाठी व जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यास मदत करते, जमिनीची होणारी धुप थांबवते. तसेच या अभयारण्यातून भीमा, घोड, बुब्रा नदीचा उगम आहे. भीमा नदीवर चासकमान, तर घोड नदीवर डिंभे धरण आहे. पुढे याच नद्यांचे पाणी उजनी धरण जाते.  त्यामुळे या अभयारण्याच्या चारही बाजूंचा विचार करून जैवविविधतेच्या दृष्टीने सुरक्षीत व संरक्षित करणे आवश्यक आहे.  त्यातून ०.०५ पासून १० किलोमीटरपर्यंत भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य इको सेंसेटिव्ह झोन जाहिर करण्यात आला आहे.  यामध्ये अभयारण्य सोडून १०१.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ समाविष्ट करण्यात आले आहे. 

९ सदस्यांची देखरेख समिती
या क्षेत्रात पर्यावरणीय बाबींचा विचार करण्यासाठी ९ सदस्यांची देखरेख समिती तयार करण्यात आली असून, याचे अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असणार आहेत. तर, सदस्य सचिव जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक असणार आहेत. तसेच, या समितीमध्ये ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वन्यजिव पुणेचे उपवरसंरक्षक, रायगड व ठाणेचे उपवनसंरक्षक, पुणे रायगड ठाणे जिल्ह्याचे नगर नियोजन अधिकारी, महाराष्ट्र सरकार पर्यावरण विभागाचे प्रतिनिधी, एक विषय तज्ज्ञ, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असणार आहेत. 

मास्टर प्लॅन तयार करणार
देखरेख समितीच्या अंतर्गत राज्य सरकारची वेगवेगळी खाती याचा मास्टर प्लॅन तयार करतील. यामध्ये जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, भूजल व्यवस्थापन याची कामे समाविष्ट असतील. तसेच, या प्लॅनमध्ये इको सेंसेटिव्ह झोनमधील पुजास्थळे, वस्त्या, शेती क्षेत्र, सुपीक क्षेत्र, बागायती क्षेत्र, फळबागा, तलाव, उद्योग यांच्या सीमा निश्चीत केल्या जातील. तसेच, इको सेंसेटिव्ह झोनमध्ये अस्तित्वातील रस्ते रूंदीकरण व मजबुतीकरण करणे, नवीन रस्ते तयार करणे, पायाभुत व नागरी सुविधांचे बांधकाम व नुतनीकरण, प्रदुषण न करणारे लघु उद्योग, स्थनिकांना रोजगार मिळूवन देणारे ईको टुरीझम, होम कॉटेजसारखे व्यवसाय पूर्वपरवानगी घेऊन करता येणार आहेत. 

या गावांचा समावेश
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील फागुलगव्हाण, आंबोली, भिवडे बुद्रूक, भिवडे खुर्द, हातवीज, आंबेगाव तालुक्यातील डोण, आघाणे, नाव्हेड, तिरपाड, नानवडे, महाळुंगेतर्फे आंबेगाव, पिंपरी, तेरूंगण, खेड तालुक्यातील भिवेगाव, भोमाळे, खरपूड, रायगुड जिल्ह्यातील जाबरंग, राजापूर, टामभरे, सिंगढोल, धोत्रे, शिलार, पथराज, खांडस, अंभेरपाडा, नांदगाव.ठाणे जिल्ह्यातील बालिवरे, डोंगरनाव्हे, जांबुर्डे, खानीवरे, सकुरली, नारीवली, उचले, देहरी, खोपवली, मिल्हे, दुधानोली, उमरोली खुर्द, दुर्गापुर, मध, रामपूर, चालू या गावांचा समावेश आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.