Pune News - भारतीय परंपरा, संस्कृती आणि कारागिरी यांचा समावेश असलेली पाच दिवसीय भीमथडी जत्रा (Bhimthadi Jatra) येत्या गुरुवारपासून (ता.२१) सुरू होणार आहे. ती २५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
यंदाची ही जत्रा पर्यावरण पूरक व प्लास्टिक मुक्त भीमथडी जत्रा म्हणून नव्या रूपात भरविण्यात येत आहे. यासाठी जत्रेतील विक्रेत्यांकडून कापडी पिशव्या आणि पेपर कटलरीचा वापर केला जाणार आहे.
या जत्रेचे उद्घाटन साडी स्टायलिस्ट अश्विनी नारायण, दूरदर्शनच्या माजी महासंचालक विजयालक्ष्मी छाबडा, भारतीय बेस बॉल संघाच्या कर्णधार रेश्मा पुणेकर यांच्या हस्ते आज केले जाणार आहे.
भारती महिला क्रिकेटर किरण नवगिरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, भीमथडी फाउंडेशन व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील मैदानात ही जत्रा भरणार आहे.
यामध्ये पुणेकर खवय्यांना खानदेशी पुरणाचे मांडे, शेंगुळी, हुलग्याचे माडगं, पिठलं-भाकरी, खानदेशी भरीत-भाकरी, थालीपीठ, हुरडा, धपाटे, कर्जतची शिपी आमटी, कोल्हापूरचा तांबडा व पांढरा रस्सा, समुद्रातील मासे, मटण, चिकन-भाकरी अशा विविध पदार्थांची चव चाखता येणार आहे.
यंदाच्या भीमथडी जत्रेत राज्य व परराज्यातील ग्रामीण भागातील महिला उद्योजकांनी बनविलेले हातमाग कपडे,आकर्षक विणकाम, सुती कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, कडधान्यांसह नाचणी, राळ, सावा, भगर, सामा, वरई यासारखे मिलेट्स, मसाले,
लोणची, शेतीमाल, फळभाज्यांचे विक्री स्टॉल, टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या टिकाऊ वस्तूंचे दालन, महाराष्ट्राची कला संस्कृती असलेली गोंधळी, पोतराज, भारुड, ज्योतिषी, पाथरवट, बुरूड, केरसुनीवाले, नंदी बैल, हलगी,
लेझीम, ढोल, गजनृत्य, आदिवासी कलादर्शन, आदिवासी नृत्य अशी आकर्षक दालने आणि कला आदींसह एकूण ३२० स्टॉल्स असल्याचे या जत्रेच्या आयोजिका सुनंदा पवार यांनी बुधवारी (ता.२०) सांगितले.
याशिवाय राज्यातील आणि परराज्यातील निवडक उत्पादनांचे दालन, पर्यावरण संवर्धन ही संकल्पना घेऊन देवराई हा उपक्रम, देशी वृक्ष संवर्धन व पर्यावरण वाचवा संदेश,विषमुक्त किचन गार्डन, मत्स्यव्यवसाय, पुष्परचना, रेशीम व मधुमक्षिका याबाबत खास माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.