पुणे : ‘‘अफगाणी भारतीयांना मोठा भाऊ मानत असल्याने तिथे आपल्या नागरिकांना धोका नाही. भारताने अफगाणिस्तानमध्ये विकासकामांमध्ये गुंतवणूक केली असल्याने ते आपल्याला भाऊ मानतात. या ठिकाणी मुला-मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले असून, ते कायम राहावे अशी मनापासून इच्छा आहे,’’ असे गेली सात वर्षे अफगाणिस्तानात अध्यापनाचे काम करणारे डॉ. पराग रबडे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ते बुधवारी सकाळीच पुण्यात परतले आहेत.
जागतिक बँक आणि अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालय राबवित असलेल्या प्रकल्पात काम करण्यासाठी डॉ. रबडे २०१४मध्ये अफगाणिस्तानमध्ये गेले होते. ते एका विषयाचे विभागप्रमुख असून, सातवर्षांपासून तेथील विद्यापीठांतून व्यवस्थापन आणि इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. त्यांनी तेथील परिस्थितीबाबत ‘सकाळ’शी मनमोकळेपणाने संवाद साधला. कोरोना काळ वगळता माझे भारतात जाणे-येणे नियमित होते, असे स्पष्ट करत डॉ. रबडे म्हणाले, ‘‘मी २०१४मध्ये अफगाणिस्तानमध्ये गेलो.
त्यावेळी तिथे दहा हजारांच्या आसपास भारतीय होते. आता ती संख्या पाच-सहा हजारांवर आली आहे. भारताने तिथल्या विकासकामांत, म्हणजे शाळा, धरणे व संसदेच्या इमारत बांधकामासाठीही मदत केली आहे. त्यामुळे अफगाण नागरिकांना भारतीयांबद्दल सहानुभूती आहे. त्या देशाचे स्वतःचे काही कायदे आहेत आणि त्याचे काटेकोरपणे पालन होते. मी अफगाणिस्तानात गेल्यापासून तालिबान्यांचा पगडा असल्याचे जाणवत होते.’’
शिक्षणाचा वाढता टक्का
ते म्हणाले, ‘‘अफगाणिस्तानात शिक्षणाचा टक्का वाढत आहे. यामध्ये मुलींची संख्याही सुधारत आहेत. धार्मिक शिक्षणाच्या मर्यादा त्यांच्या लक्षात आल्या आहेत. काही राज्यांत शिक्षणाची परिस्थिती चांगली असून, काबूलमध्ये ६४ खासगी विद्यापीठे मोफत शिक्षण देतात. सुरुवातीला मला धर्माबाबत अनेक प्रश्न विचारले जात होते, त्यावेळी ‘मी माणूस म्हणून इथे आलो आहे,’ असे उत्तर मी देत असे.आपणही त्या दृष्टिकोनातून पाहावे, असे सांगितल्यावर त्यांनी कधीही त्रास दिला नाही.’’
तीन महिन्यांत परिस्थिती बदलली
अमेरिकेने ऑगस्टच्या अखेरीस सैन्य माघारीची घोषणा केली, त्यामुळे दिवसागणिक परिस्थिती बदलत गेली, असे सांगत ते म्हणाले, ‘‘तालिबान्यांना अपेक्षेपेक्षा लवकर देशाचा ताबा मिळाला. काबूलवर ताबा मिळवायला किमान दोन-तीन महिने लागतील, असे वाटत होते, प्रत्यक्षात तीन तासांत काबूल पडले. त्यामुळे घबराट पसरली. काही वेळातच सर्व सरकारी कार्यालये बंद झाली. अशा परिस्थितीत सुरक्षित वाट धरण्यासाठी धावपळ उडाली. कोणत्याही परदेशी नागरिकाला त्रास दिला जाणार नाही, मात्र, अफगाणिस्तानात राहायचे असल्यास परदेशी गुलाम म्हणून राहावे, अन्यथा मायदेशी परतावे, अशी तालिबान्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे मायदेशी परतण्यासाठी सर्वांची धांदल उडाली. मीही केवळ एक सुटकेस घेऊन परत आलो आहे.’’
परिस्थिती बदलेल
ते म्हणाले, ‘‘एखादी संघटना चालवणे वेगळे आणि देश चालविणे निराळे. आता सत्ता कोण ताब्यात घेणार, यावर खूप काही अवलंबून आहे. तालिबान्यांनी सर्व ऑफिसेस, शाळा, दैनंदिन व्यवहार सुरू करायला परवानगी दिली आहे. मी भारतात येण्यासाठी विमानतळावर जात असताना अनेक विद्यार्थी शाळेत जाताना दिसले. अफगाणिस्तानमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत राहो, अशी शिक्षक म्हणून माझी भावना आहे.’’
बॉलिवूड आणि अफगाणिस्तान
अफगाणिस्तानमध्ये बॉलिवूडची प्रचंड क्रेझ आहे. भारतीय चित्रपट व मालिका तेथे आवडीने पाहिल्या जातात. अफगाणिस्तानमध्ये ‘सास भी कभी बहू थी’ विशेष लोकप्रिय आहे. ‘पानिपत’ चित्रपटबाबत अनेकांनी महंमद गझनीवरून माझ्याशी वाद घातल्याचे डॉ. रबडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.