पुणे - देशात प्रथमच "बीएस-6' वाहनांसाठी डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्याचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. प्राज इंडस्ट्रीज आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांच्यामध्ये नुकताच यासंबंधीचा सामंजस्य करार झाला आहे.
सध्या वाहनांमध्ये पेट्रोलसोबत इथेनॉल वापरण्यात येते; परंतु डिझेलमध्ये ते वापरण्यासाठी अजूनही संशोधनाची आवश्यकता आहे. नव्याने आलेल्या "भारत स्टेज-6' वाहनांसाठी इंधन म्हणून डिझेलसोबत इथेनॉल वापरण्यासाठी "जैव-उत्प्रेरक' (बायोऍडिटीव्ह) विकसित करण्यात येणार आहे. "बीएस-3' आणि "बीएस-4' वाहनांसाठी "एआरएआय'ने हे तंत्रज्ञान विकसित केले होते. आता "बीएस-6'च्या मानकांवर उतरण्यासाठी आवश्यक संशोधन करण्यात येणार आहे.
प्राजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले,""थेट जैव-इंधनाच्या वापराला मर्यादा आहेत. पण डिझेलसोबत इथेनॉल वापरल्यास परकीय गंगाजळी वाचेल पण, त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनाला मोठा आळा बसेल. आमच्या बायो-मोबिलिटी या प्रकल्पांतर्गत पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी संशोधन आणि विकासाचे काम आम्ही करत आहे.'' या करारामुळे खनिज तेलाची बचत तर होईल, पण सार्वजनिक आणि औद्योगिक वाहतुकीचे रुपडेच पालटून जाईल.
इथेनॉल मिश्रित डिझेलचे फायदे -
- देशातील 8 ते 10 टक्के डिझेलचा वापर कमी होईल
- कार्बन उत्सर्जन कमी होत प्रदूषणाला आळा बसेल
- इंधनाची आणि वाहनाची किंमत कमी होईल
- जैव-अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
- कृषी, साखर उद्योगांसाठी नवीन संधी
- इंजिनमध्ये अतिरिक्त बदलाची आवश्यकता नाही
बीएस-4 वाहनातील निरीक्षणे(टक्केवारीत)
- इथेनॉलचे प्रमाण - 7.7
- कार्बन मोनॉक्साईडमध्ये घट - 50
- काजळीतील घट - 25
- धुराची घट - 40
शहरांतील पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी इथेनॉल मिश्रित डिझेल वरदान ठरेल. "सीएनजी'ला एक सक्षम पर्याय म्हणून हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.
- डॉ. प्रमोद चौधरी, संस्थापक अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज
डिझेलसोबत इथेनॉलची एकजीवता वाढविण्यासाठी दर्जात्मक स्वदेशी बायोऍडीटीव्ह आम्ही विकसित करत आहोत. प्राजच्या साह्याने तंत्रज्ञान विकसित करण्यापासून प्रत्यक्ष औद्योगिक वापरापर्यंत आम्ही प्रयत्नशील आहे.
- नीलकंठ मराठे, कार्यकारी संचालक, एआरएआय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.