पिंपरी - विविध कारणांमुळे वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम जैवविविधता अर्थात वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटकांवर होत आहे. त्यांच्या संवर्धनासाठी महापालिकेने तीन कलमी कार्यक्रम आखला आहे. त्या माध्यमातून सध्याच्या जैवविविधतेचे विविध पैलू व शहर क्षेत्रातील जैवविविधता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असून, त्यांच्याकडूनही सूचना मागविणार आहेत.
शहरातील वाढती वाहनसंख्या, कारखानदारी, कचरा जाळणे आदी कारणांमुळे वायू प्रदूषण होत आहे. त्याचा विपरित परिणाम नागरिकांसह वनस्पती, पशू-पक्ष्यांवर होत आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी व कंपन्यांतील रसायनयुक्त पाणी नाले व गटारांद्वारे थेट मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. त्यात गाळ साचला आहे. नदीकाठावर भराव टाकून पात्र अरुंद केले जात आहे. त्यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे.
नागरीकरणामुळे शेती क्षेत्र व झाडांची संख्या कमी होऊन टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. दरवर्षी वृक्षारोपण करून व उद्यानांच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोप राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या जोडीला आता महापालिकेने काही प्रकल्प हाती घेतले आहेत. त्या माध्यमातून जैवविविधतेचे संवर्धन केले जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील टेराकॉन कंपनीची निवड केली आहे. शहरातील नागरिकांकडूनही काही सूचना मागविण्यात येणार आहेत.
...असा आहे कार्यक्रम
शहरातील जैवविविधता संवर्धनासाठी नागरिकांनी केलेल्या सूचनांची जैवविविधता नोंदवही बनविण्यात येणार आहे. शहरातील जैवविविधता निर्देशकांचे मूल्यांकन केले जाणार आहे आणि स्थानिक जैवविविधता धोरण व कृती योजना तयार केली जाणार आहे. या माध्यमातून जैवविविधता समृद्ध केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील जैविक साखळीचा समतोल राखला जाणार आहे.
असंवेदनशील नागरिक व काही राजकीय व्यक्तींमुळे शहरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. ती जपण्यासाठी उचललेले पाऊल स्तुत्य आहे. केवळ वड, पिंपळ, चिंच यांसह सर्व प्रकारची झाडे लावणे आवश्यक आहे. उद्यान परिसरातील इमारतींच्या छतावरील पाणी पाणवठ्यांमध्ये साठवावे.
- डॉ. संदीप बाहेती, पर्यावरणप्रेमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.