Birth & Death certificate
Birth & Death certificateesakal

Birth Death Certificate : पुण्यात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी हेलपाटे, सॉफ्टवेअर बदलामुळे नागरिकांची पायपीट

पुणे महापालिकेच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयांत जन्म व मृत्यू दाखल्याची प्रत घेता येत होती. मात्र, केंद्र सरकारने या जन्म - मृत्यू दाखल्याच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केला आहे.
Published on

पुणे - पुणे महापालिकेच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयांत जन्म व मृत्यू दाखल्याची प्रत घेता येत होती. मात्र, केंद्र सरकारने या जन्म - मृत्यू दाखल्याच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केला आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रीय कार्यालयात जन्म किंवा मृत्यूची नोंद झाली आहे. तेथेच दाखला मिळत आहे.

त्यामुळे नागरिकांना संबंधित क्षेत्रीय कार्यालयात जाऊनच दाखले काढावे लागत आहेत. त्यातच वारंवार ‘सर्व्हर स्लो’ होत असल्याने एकाच कामासाठी दोन ते तीन वेळा हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे.

पुणे शहरातील २०१९ पासून केंद्र सरकारच्या नागरी नोंदणी सॉफ्टवेअरमध्ये (सीआरएस) जन्म व मृत्यूची नोंदणी होते. त्यामध्ये आतापर्यंत शहरात कोणत्याही भागात जन्म अथवा मृत्यू झाल्यास नागरिकांना महापालिकेच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून जन्म-मृत्यूचे दाखले मिळत होते. पण २४ जूनपासून या सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. त्यामध्ये ज्या क्षेत्रीय कार्यालयात जन्म किंवा मृत्यूची नोंद झाली आहे. तेथेच दाखला मिळत आहे. याचा फटका अनेक नागरिकांना बसत आहे.

दाखला मिळविण्याची प्रक्रिया लांबली

जन्म किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी संबंधित रुग्णालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना माहिती दिली जाते. त्यानंतर १५ दिवसांत दाखला तयार होतो. या नवीन बदलानुसार जन्म - मृत्यू कार्यालयात नातेवाइकांना पिवळा, गुलाबी, पांढऱ्या रंगाचे अर्ज भरून त्यासोबत ओळखपत्र जोडावे लागते. त्यानंतर तेथे दाखल्याची प्रिंट काढून मिळत आहे.

ही प्रिंट घेऊन नागरी सुविधा केंद्रात जाऊन पैसे भरून दाखल्यावर महापालिकेचा शिक्का घ्यावा लागत आहे. नागरिकांना एकाच कामासाठी दोन वेळा रांगेत उभे राहावे लागत आहे. यात वेळ वाया जात असून, शिवाय कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत.

असा होत आहे त्रास

समजा वडगाव शेरीमध्ये राहणाऱ्या एखाद्या महिलेने कोथरूडमधील रुग्णालयात बाळाला जन्म दिला किंवा एखाद्या व्यक्तीचा कोथरूडमधील रुग्णालयात मृत्यू झाला. तर याची नोंद त्याच भागातील क्षेत्रीय कार्यालयात होते. पूर्वी जन्म किंवा मृत्यू कोणत्याही भागात झाला तरी शहरातील कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून दाखला मिळत होता.

मात्र, आता या नवीन बदलामुळे या नागरिकांना कोथरूडच्या क्षेत्रीय कार्यालयातच येऊन दाखले घ्यावे लागत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी, प्रवासासाठी लागणारा वेळ पाहता हा बदल नागरिकांसाठी गैरसोयीचा ठरत आहे.

केंद्र सरकारने नागरी नोंदणी सॉफ्टवेअरमध्ये (सीआरएस) बदल केला आहे. ज्या क्षेत्रीय कार्यालयात जन्म-मृत्यूची नोंद झाली आहे. तेथेच दाखला दिला जात आहे. याबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे. तसेच नवीन सॉफ्टवेअरचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नागरिकांना, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी शासनाला कळविण्यात आल्या आहेत.

- डॉ. कल्पना बळीवंत, प्रभारी आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

माझ्या मुलीचा जन्मदाखला घेण्यासाठी मी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात गेलो होतो, पण तिच्या जन्माची नोंद वारजे क्षेत्रीय कार्यालयात झालेली असल्याने मला तिकडे जाण्यास सांगितले. शहरातील कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात दाखल्याची प्रिंट मिळते हे माहिती होते, पण हा बदल कधी झाला माहिती नसल्याने हेलपाटे मारावे लागले.

- प्रशांत पाटील, सिंहगड रस्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.