भाजपकडूनही ‘लक्ष्मीदर्शन’, हे बरे नव्हे!

Batmichya-Palikade
Batmichya-Palikade
Updated on

राजकारणाचा आता धंदा झाला आहे, हे त्रिवार सत्य. पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंडळींनी राजकारणाच्या नावाखाली जे करायला नको ते-ते सर्व केले म्हणून जनतेने त्यांना स्पष्टपणे नाकारले. गल्ली ते दिल्ली भाजपला सत्ता दिली. वरचे सांगता येत नाही, पण खाली महापालिकेत तरी सध्याची परिस्थिती ‘न पहावे डोळा’ अशीच आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दृष्टचक्र भाजपलाही भेदता आलेले नाही, हे दिसले. न पेक्षा ते अधिक तीव्र झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. लोकभावना वेगाने बदलते आहे, ‘असह्य’ झाल्याची प्रतिक्रिया सर्रास ऐकू येते. तसे दाखले अनेक देता येतील. पण, हे थांबायला हवे अन्यथा खैर नाही.

शंभर ग्रॅमची चांदीची नाणी
काँग्रेस काळात राजकारण करताना नेते आणि कार्यकर्तेसुद्धा भेळभत्त्यावर दिवस काढत. सामाजिक दायित्वाची एक भावना असे. काळ बदलला. कार्यकर्त्या आणि मतदार सांभाळण्यासाठी दिवाळीला मिठाईचे पुडे वाटप होऊ लागले. ती एक परंपराच होऊन बसली. भाजपने किमान त्याचे तारतम्य बाळगणे गरजेचे होते. त्यांनी दोन पावले पुढे टाकली. मतदार सांभाळणाऱ्या तमाम बूथ प्रमुखांची दिवाळी यंदा अधिक गोड आणि चमचमीत करायचे ठरवले. दिवाळीला खऱ्या अर्थाने ‘लक्ष्मीदर्शन’ सोहळा झाला. बहुतांश पदाधिकाऱ्यांना मिठाईच्या बॉक्‍सबरोबर कमळावर बसलेल्या लक्ष्मीची १०० ग्रॅमची चांदीची नाणी अगदी घरपोच मिळाली. एका बड्या नेत्याने ही चांदी वाटली. त्याबरोबर पिंपरी विधानसभेसाठी तयारी करणाऱ्या एकाने कार्यकर्त्यांचा वकुब ओळखून त्यानुसार रोख रकमेची पाकिटे तयार केली आणि मिठाईबरोबर वाटली. संघ संस्कारात वाढलेल्या काही निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना हे ‘लक्ष्मीदर्शन’ चांगलेच खटकले. आपल्या संस्कारात ते बसत नसल्याने त्यांचा कोंडमारा झाला. काहीजणांनी थेट माध्यमांकडे वाच्यता केली. बातम्या छापून आल्याने बोभाटा झाला. हे प्रकरण चर्चेचा विषय बनले.

ओली पार्टी आणि रमणाही
आखाडात ओली सुकीची चर्चा ऐकली होती. काही पुढाऱ्यांच्या वतीने तारांकित हॉटेलात, फार्महाऊसवर जंगी पार्ट्या चालतात हे वास्तव आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन दिवाळीतील गोडधोडाला कंटाळले म्हणून की काय फराळाच्या नावाखाली ओल्या पार्ट्या आणि बरेच काही झाले. प्रथम विरोधी पक्षाच्या एका नेत्याने ओल्या पार्टीबरोबर स्वतःची छबी असलेली घड्याळे वाटली. नंतर महापालिकेची तिजोरी सांभाळणाऱ्यांनीही गांधी बाबांचा छाप असलेली ‘मिठाई’ वाटली. ज्यांनी घेतले त्यांच्या नावांची यादी आता प्रदेश भाजप कार्यालयात गेली आहे. दोघांनी केले म्हणून शहराच्या प्रथम नागरिकानेही तोच कित्ता गिरवला. महापालिकेत माध्यम प्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या काही महाभागांसाठी (सर्व नाही) हा घाट होता. इथेही लक्ष्मीदर्शन सोहळा चांगलाच रंगला. माध्यमातील अनेक ज्येष्ठांना हा प्रकार रुचला नाही. त्यांनी ‘हे वागणे बरे नव्हे’ असे महापौरांना सुनावलेदेखील.

ओल्या पार्टीनंतरचा किस्सा आणखी मजेशीर आहे. पूर्वी पेशव्यांच्या काळात होतो अगदी तसाच महापौरांच्या सदरेवर रमणाही झाला. चिखली गावात जाधवांची गढी आहे. हे गाव तसे संस्थानिकांचे. महापौर राहुल जाधव हे तसे अत्यंत साधे, सरळ, निर्विकार व्यक्तिमत्त्व. ते स्वतः संस्थानिक नाहीत, कष्टकरी आहेत. पण, त्या निमित्ताने क्षणभर तेसुद्धा संस्थानिक झाले.

त्यांनीही पेशवाईचा रमणा (दक्षिणा वाटप) वारसा पुढे चालवला. हे कधी झाले कोणाच्या सांगण्यावरून झाले याहीपेक्षा संस्कारक्षम भाजपच्या मंडळींना हे शोभत नाही, असे पुन्हा पुन्हा नमूद करावे वाटते. मतदारांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, हे लक्षात असू द्या. एकाने चांदीची नाणी वाटली म्हणून दुसऱ्याने लगेच रोकड वाटायची. याचा दुसरा अर्थ भ्रष्ट कारभाराला तुम्हीच खतपाणी घालता आहात. भय, भ्रष्टाचारमुक्त नव्हे युक्त म्हणायची वेळ आली आहे. पैसा अधिक झाला असेल तर दुष्काळी परिस्थितीचा विचार करा. आपल्या शेजारील शेतकरी बांधवांसाठी चारा छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर, उपासमार होऊ नये म्हणून अन्नछत्र असे काही उपक्रम राबवा. लोक शहाणे आहेत. तुम्ही चांगले केलेत तर ते तुम्हाला डोक्‍यावर घेतील. आणि जर पूर्वीचीच थेरं चालू राहिली तर खैर नाही. डोक्‍यावर घेऊन तुम्हाला पुन्हा आपटतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विचार करा आणि बदला इतकेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.