पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अकारण वादात ओढू नका. तसेच मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी टीका करताना संयम बाळगावा, असे आवाहन भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी रविवारी (ता.२२) केले.
अमृता फडणवीस यांच्या भाऊबीजेच्या दिवशी रिलीज झालेल्या एका गाण्यावर टिळेकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. वस्तुतः तिला जगू द्या, या शीर्षकाच्या गीताद्वारे अमृता फडणवीस यांनी 'बेटी बचाओ'चा लोकहितकारक संदेश या गीतातून दिला आणि स्त्रीभ्रूणहत्या ह्या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयावर भाष्य केले. त्यांच्या गायनावर महेश टिळेकर यांनी टीका केली. त्यामुळे फेसबुक आणि सोशल मीडियावर त्याची प्रतिक्रिया उमटली. त्यावर अनेकांनी नापसंती व्यक्त केली आणि महेश टिळेकर यांच्यावर काहींनी टीका, तर काहींनी समर्थनाच्या पोस्ट टाकल्या.
आता या सर्वांशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा संबंध काय? मात्र महेश टिळेकर यांनी कोणतेही सबळ कारण नसताना पाटील यांच्यासोबतचे एका कार्यक्रमातील फोटो फेसबुकवर पोस्ट करून आपल्या मर्यादा ओलांडताना अनावश्यक बादरायण संबंध जोडले आहेत. त्यात त्यांनी अकलेचे तारे तोडताना त्यांच्या पोस्टमुळे खवळलेल्यांना भाजप भक्त आणि समर्थक संबोधले आहे, असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.
चंद्रकांतदादांसोबतचा एका कार्यक्रमातील फोटो पोस्ट करुन 'स्टेजवर भक्तांचे लाडके नेते चंद्रकांत पाटील माझ्याबरोबर आहेत हातात हात देताना. म्हणजे मी जे काही त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची हिंमत केली त्यामागे चंद्रकांत पाटील यांचा हात आणि पाठिंबा आहे, असाही अर्थ आता हे भक्त काढतील का हा फोटो पाहून? असा सवाल करतानाच राजकारणात काट्याने काटा काढायचा असतो आणि या कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला करोडो रुपये मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आता काय म्हणाल, माझ्यावर टीका करणाऱ्या भक्तांनो' अशी तद्दन फालतू विधाने करुन प्रसिद्धी मिळविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे.
या वादात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे फोटो वापरून त्यांना ओढण्याचा टिळेकरांचा प्रयत्न निषेधार्ह असून त्यांनी याबाबत क्षमायाचना करावी, असे निरर्थक आणि संदर्भहीन वक्तव्ये टाळावीत. अन्यथा त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी, असेही खर्डेकर यांनी म्हटले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.