BRT Route : ‘बीआरटी’ला हवा दुरुस्तीचा डोस; ‘पीएमपी’ची मागणी

बीआरटी बस थाब्यांमधील सोयीसुविधांची झालेली तोडफोड, स्वयंचलित दरवाजांची रखडलेली दुरुस्ती, सेंटर लाइन पेंटिंग, तुटलेले रस्ता दुभाजक, रेलिंग, नादुरुस्त बाक अशी स्थिती झाली आहे.
BRT Route
BRT Routesakal
Updated on

पुणे - बीआरटी बस थाब्यांमधील सोयीसुविधांची झालेली तोडफोड, स्वयंचलित दरवाजांची रखडलेली दुरुस्ती, सेंटर लाइन पेंटिंग, तुटलेले रस्ता दुभाजक, रेलिंग, नादुरुस्त बाक अशी स्थिती झाली आहे. याची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच स्वयंचलित टायमर बसविण्याची मागणी पीएमपीने पुन्हा एकदा महापालिकेकडे केली आहे.

तसेच बीआरटीसाठी अर्थसंकल्पात कायमस्वरूपी तरतूद करावी, असेही सुचविले आहे. दरम्यान, या बाबत अर्थसंकल्पात तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यानच्या काळात दुरुस्तीची कामे कधी होतील, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

‘पीएमपी’च्या प्रवासी सेवेत ‘बीआरटी’चा मोठा वाटा आहे. ‘बीआरटी’मुळे पीएमपीची प्रवासी सेवा गतिमान झाली. मात्र त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अपूर्ण मार्गिका, बसथांब्यांची दुर्दशा, देखरेखीअभावी बसथांब्यांवरच्या वस्तूंच्या होणाऱ्या चोऱ्या आदींमुळे ‘बीआरटी’ची अवस्था दयनीय झाली आहे.

शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गासह संगमवाडी ते विश्रांतवाडी आणि येरवडा ते वाघोली या मार्गांतील बीआरटीच्या प्रत्येक थांब्यांमध्ये दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या तिन्ही मार्गांतील बसथांब्यांवरील वस्तूंची व स्वयंचलित दिव्यांच्या यंत्रणेची समाजविघातक घटक वारंवार तोडफोड करतात. त्यामुळे हे दिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. तसेच मद्यपींकडून होणाऱ्या उपद्रवामुळे प्रवासी त्रस्त झाले असून, पोलिसांचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर बीआरटी मार्गांसाठी महापालिकेने अर्थसंकल्पात कायमस्वरूपी तरतूद करून देखभाल- दुरुस्तीची कामे नियमितपणे करावीत, अशी मागणी पीएमपीने महापालिकेकडे एका पत्राद्वारे केली आहे.

महापालिकेने हे केले पाहिजे

  • तीव्र उतार असलेल्या ठिकाणी गतिरोधक

  • अपघात टाळण्याकरिता भुयारी मार्गांमध्ये आरसे

  • तिकीट केबिनच्या दरवाजांची दुरुस्ती

  • बीआरटी मार्गांमध्ये अन्य वाहनांना अटकाव

  • थांब्यांमधील दरवाजांना स्वयंचलित यंत्रणा

  • प्रत्येक थांब्याजवळ ‘स्टॉप, लुक, गो’ अशा आशयाचे सूचना फलक

  • प्रत्येक थांब्यातील सूचना व स्थानकाच्या नावांच्या फलकांची दुरुस्ती

  • सर्व थांब्यांमध्ये डस्टबिन

पीएमपीच्या पत्रात म्हटले आहे...

स्वारगेट ते कात्रज मार्ग

स्वारगेट ते कात्रज मार्गावरील बसथांब्यांच्या दरवाजांची मोडतोड झाली आहे. नागरिक तुटलेल्या रेलिंगमधून ये-जा करतात. त्यामुळे तेथे दुरुस्ती आवश्यक आहे. तसेच पद्मावतीजवळ वाहतूक चिन्हांचे फलक बसविणे आवश्यक आहे. पादचारी मार्गाजवळील पादचारी दुभाजक तुटलेले आहेत. बालाजीनगर येथील थांब्यात प्रवेश करण्यासाठी जागा अपुरी आहे. येथे रिफ्लेक्टर आणि फ्लोरिंगला पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. शंकर महाराज मठ थांब्यातील भुयारी मार्गात आरसे आवश्यक आहेत, असेही पीएमपीने महापालिकेला पत्रात सुचविले आहे.

संगमवाडी ते विश्रांतवाडी मार्ग

संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्गातील थांब्यातील विद्युत मीटर स्वतंत्र बॉक्समध्ये बसविणे आवश्यक आहे. वायरिंग उघडे असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. विद्युत दिव्यांचे स्वयंचलित टायमर रिसेट करणे. सर्व थांब्यांमधील स्वयंचलित दरवाजांची देखभाल-दुरुस्ती व्हावी. भुयारी मार्गातील सर्व एलईडी दिवे बंद आहेत.

त्यामुळे भुयारी मार्गात गैरप्रकार घडत असल्यामुळे शालेय विद्यार्थी व महिला प्रवाशांना असुरक्षित वाटते. पादचारी मार्गातील रॅम्परीलिंग, स्टील बोलार्ड आणि प्लॅटफॉर्मवरील फरशा तुटलेल्या आहेत. थांब्यातील छताचे शीट निखळलेले आहे. याकडेही तातडीने लक्ष द्यायला हवे, असे पीएमपीने महापालिकेला सांगितले आहे.

बीआरटी थांब्यांमधील आणि बसमधील दरवाजे, बैठक व्यवस्था, विद्युतविषयक आदी दुरुस्तीबाबत महापालिकेला पत्र दिले आहे. तसेच बीआरटी अधिक सक्षम करण्यासाठी आराखडा तयार करून महापालिकेला पाठविला आहे. यांच्यासह बीआरटी मार्गातून जाणाऱ्या इतर वाहनांवर कारवाई करण्याबाबतचे पत्र वाहतूक पोलिसांना दिले आहे.

- अनंत वाघमारे, बीआरटी प्रमुख, पीएमपी

बीआरटीतील समस्यांबाबतचे पत्र बीआरटी विभागाकडून मिळाले असून, स्वारगेट ते कात्रज, येरवडा ते वाघोली आणि संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्गांतील बसथांब्यांवर प्रत्यक्ष पाहणी केली आहे. येथील आवश्यक दुरुस्तीसाठी स्वतंत्र बजेटची तरतूद केली जाणार आहे.

- श्रीनिवास कंदुल, विद्युत विभागप्रमुख, पुणे महापालिका.

स्वारगेट-कात्रज दरम्यानच्या बीआरटीने मी रोज प्रवास करतो. परंतु, खासगी वाहनांची बीआरटी मार्गात सर्रास घुसखोरी होते. त्यामुळे वारंवार लहान-मोठे अपघात होता. बीआरटी मार्गातील खासगी वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. तसेच, स्थानकाचे स्वयंचलित दरवाजेही बंद आहेत.’

-आतिश जाधव, प्रवासी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.