केंद्र सरकारचा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी लोकसभेत सादर केला.
पुणे - केंद्र सरकारचा (Central Government) सन 2022-2023 चा अर्थसंकल्प (Budget) अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी लोकसभेत (Loksabha) सादर केला. हा अर्थसंकल्प नवसंजीवनी देणारा असून तो संकटात आलेल्या उद्योग-व्यवसायाला 'बूस्टर डोस' (Booster Dose) ठरेल अशा सकारात्मक प्रतिक्रिया विविध क्षेत्रातील उद्योजक व व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.
जीतो पुणे संघटनेच्या वतीने विविध उद्योग व व्यवसायातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प पाहण्याची व्यवस्था जीतो पुणे च्या कार्यालयात केली होती. सामान्य माणसाला अर्थसंकल्प समजावा या हेतुने विविध उद्योग व व्यवसायातील मान्यवरांना जीतोतर्फे निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याकडून अर्थसंकल्प समजून घेण्यात आला. यावेळी जीतो अॅपेक्स चे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जेएटीएफचे इंदर जैन, इंदर छाजेड, जीतो रेस्ट ऑफ़ महाराष्ट्र चे अजय मेहता, विशाल चोरडिया, जीतो लेडीज विंगच्या अध्यक्षा खुशाली चोरडिया, मुख्य सचिव लकिशा मर्लेचा, जीतो पुणे युथ विंगचे अध्यक्ष गौरव नहार, मुख्य सचिव प्रितेश मुनोत, किशोर ओसवाल, संदीप लुणावत आदी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती जीतो पुणेचे मुख्य सचिव पंकज कर्नावट व सचिव चेतन भंडारी यांनी दिली.
यावेळी उपस्थित विविध उद्योग व व्यवसायातील मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे, -
अर्थसंकल्पात पंतप्रधान निवास योजना आणि पायाभूत सुविधांसाठीची तरतूद विशेष उल्लेखनीय आहे. गुंतवणूक वाढवल्याने हा अर्थसंकल्प विकासाला बूस्टर डोस ठरेल. जीएसटी संकलन सर्वाधिक झाल्याने आनंद आहे. मात्र सरकारने मागच्या काळातील व्यवस्थेमधील दोषामुळे निघत असलेल्या चुका मान्य करून व्यावसायिकांना दंड देणे थांबवावे. मेडिक्लेम योजना कामगारांबरोबरच उद्योजक व व्यावसायिकांना देखील लागू करावी. एकूणच हा अर्थसंकल्प सकारात्मक असून यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
- विजय भंडारी (राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो अॅपेक्स)
जीतो पुणेच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र पाठवलं होतं. यामध्ये आम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याचा अंतर्भाव अर्थसंकल्पात दिसला. त्याचा विशेष आनंद आहे. अर्थसंकल्पामुळे ज्वेलरी व्यवसायाला चालना मिळेल. तसेच, सर्वसामान्य माणसाला अर्थसंकल्पाचा अर्थ लागावा म्हणून आज संस्थेने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अर्थसंकल्प समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
- ओमप्रकाश रांका (अध्यक्ष, जीतो पुणे)
कोविड मध्ये गेल्या दोन वर्षांत भारत सरकारसमोर मोठी आव्हानं निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज सादर झालेला अर्थसंकल्प चांगला आहे. आपली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी हा अर्थसंकल्प मदत करणारा आहे. कर प्रणाली आहे तीच ठेवल्याने सामान्य नोकरदार माणसाला, व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. व्यापाऱ्यांचा त्रास कमी केला आहे. शिक्षण क्षेत्रासाठी काही तरतुदी केल्या असून प्राप्त परिस्थितीत जितकं सकारात्मक करणं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा या अर्थसंकल्पात दिसला. एकूणच सध्याच्या आव्हानात्मक काळात दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे.
- ॲड एस के जैन ( वकील)
नरेंद्र मोदी सरकारचे आज सादर झालेले बजेट हे 'प्रोग्रेसिव्ह बजेट' वाटते. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या आजच्या बजेट मध्ये मोदी सरकार पायाभूत सुविधांवर अधिक भर देत असल्याचे स्पष्टपणे जाणवले. 80 लाख घरं पंतप्रधान निवास योजनेतून बांधण्यात येणार आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. तरीदेखील बजेटमधील सर्व तरतुदी समोर आल्यानंतरच आणखी बजेटचा अर्थ लागेल.
- शांतीलाल कटारिया (उपाध्यक्ष, क्रेडाई इंडिया)
कोविड च्या काळात खूप खर्च झाला असल्याने कर वाढतील असं वाटलं होतं पण तसं झाले नाही. पंतप्रधान निवास योजनेतून 80 लाख घरं बांधण्याचा संकल्प पूर्णत्वाला जायला हवा. 2047 मध्ये अर्धी लोकसंख्या शहरात असेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळं रिअल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस येतील. याबरोबरच सरकारने ब्लड बँकांना अनुदान देऊन सामान्य माणसाला अल्प दरात रक्ताचा पुरवठा व्हायला हवा याकडे लक्ष द्यायला हवे. अर्थसंकल्प पाहता सरकारचं धोरण चांगले वाटले.
- मनोज छाजेड (संचालक, सिद्धी ग्रुप)
कोरोनामुळे झालेल्या नुकसानीनंतर उद्योग व व्यवसाय क्षेत्राची पुनर्बांधणी करण्यासाठी उपयुक्त असा हा अर्थसंकल्प आहे. प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी हा अर्थसंकल्प बूस्टर डोस ठरेल. यामुळं पॅकेजिंग क्षेत्रातील निर्यात नक्की वाढेल.
- मोहन भंडारी (बिलकेअर)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आजच्या अर्थसंकल्पात सर्व गोष्टींचा अतिशय व्यवस्थित समतोल साधला आहे. पीएम गतिशक्ती योजना हा विषय गेम चेंजर ठरेल. सर्क्युलर इकॉनॉमीसाठी ही चांगली गोष्ट आहे. हे सरकार पायाभूत सुविधांवर अधिक भर देत असल्याचे आजच्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा दिसून आले.
- इंदर जैन (चेअरमन, जेएटीएफ)
अर्थसंकल्पात अनेक चांगल्या योजना दिसल्या. प्रगतीला पोषक असा हा अर्थसंकल्प आहे. मात्र, एका मुद्याकडे लक्ष वेधायचं आहे. ते म्हणजे कोरोना काळात अन्नधान्य व्यापाऱ्यांनी खूप चांगलं काम केले. अशा परिस्थितीत सध्या रिटेल व्यापाऱ्यांसमोर मोठी आव्हानं आहेत. 8 कोटी हे व्यापारी असून 20 कोटी नागरिक या क्षेत्रावर अवलंबून आहेत. सरकारने या क्षेत्राची जबाबदारी घेऊन योग्य निर्णय घ्यायला हवेत.
- राजेंद्र बाठिया (अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर)
जीतो पुणेच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये कर प्रणाली संदर्भात, क्रिप्टो करंसी आणि इतर सूचना नमूद करण्यात आल्या होत्या. आम्ही पाठवलेल्या निवेदनातील बहुतांश सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश केला आहे. ही खूप समाधानाची बाब आहे. याबरोबरच सरकारने एक गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे कौटिल्य यांनी सांगितल्याप्रमाणे कर प्रणालीमध्ये सुसूत्रता आणली पाहिजे.
- सुहास बोरा (सीए)
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी उत्कृष्ट बजेट सादर केले. जो विरोधाभास होता तो कमी केला. आणि 80 लाख घरं बांधण्यासाठी मोठी तरतूद केली असल्यानं रिअल इस्टेट व्यवसायाला चांगले दिवस येतील. परंतु, सरकारने रिअल इस्टेट क्षेत्राचा विकास होण्यासाठी या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा द्यायला हवा.
- रविंद्र सांकला (संचालक, रविराज रिअॅल्टी)
आजचा अर्थसंकल्प चांगला असून तो दूरदृष्टी ठेवून तयार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किंमत देण्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपयांची तरतुदीचा निर्णय चांगला वाटला. सर्व माहिती समोर आल्यानंतर याविषयी आणखी माहिती मिळेल.
- प्रकाश पारख (उद्योजक)
अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प प्रोग्रेसिव्ह आहे. सरकारकडून आम्हा देशातील उद्योजकांची एक अपेक्षा आहे. ती म्हणजे ज्याप्रमाणे सरकार परदेशी कंपन्यांना एक खिडकी योजनेद्वारे परवानग्या देते आणि सुविधा देते तशा आम्ही 40-50 वर्षे काम करणाऱ्या देशांतर्गत उद्योजकांनाही सुविधा पुरवून पाठबळ द्यावे. यामुळे कृषी, इलेक्ट्रॉनिक आणि इतर अनेक क्षेत्रातील उत्पादनांच्या निर्यातीसाठी वाव मिळेल.
- राजेंद्र बोरा (उद्योजक)
डायरेक्ट टॅक्सेस मध्ये काही बदल झालेला नाही. एज्युकेशन सेस संबंधीची तरतूद चुकीची वाटते. जीएसटीचं वाढणारं संकलन ही खूप चांगली बाब आहे. निरंतर विकासासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. डिजिटल एज्युकेशन संबंधीचे निर्णय योग्य आहेत.
- वर्धमान जैन (सीए)
हेल्थकेअर सिस्टीम डिजिटल होतेय ही खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या अर्थसंकल्पात याविषयी ठोस भूमिका दिसते. आरोग्य क्षेत्रातील संशोधनावर विशेष भर दिला जाणार असल्याने आरोग्य क्षेत्राला चांगली दिशा मिळेल व नवीन संशोधन होईल.
- राहुल दर्डा (औषध वितरक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.