Motivation News : आईवडिलांसाठी मुलाने स्वतःच्या हाताने बांधला बंगला

शेतकरीपुत्र बनला गवंडी; कष्टकऱ्यांचे टुमदार बंगल्याचे स्वप्न साकार, पंचक्रोशीत चर्चेचा विषय
Bunglow
BunglowSakal
Updated on

पुणे - झोपडीत राहून आयुष्यभर शेतात कष्ट करणाऱ्या आईवडिलांना स्वतःच्या हाताने बांधलेला टुमदार बंगला भेटीदाखल देणारा शेतकरीपुत्र प्रशांत रामचंद्र माने आता भाटघर धरणाच्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे.

३२ वर्षांच्या प्रशांतची वाटचालदेखील प्रेरणादायी आहे. भाटघर जलाशयाच्या शेवटच्या भागातील भुतोंडे, गृहिणी ही वेल्हा तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना भात हेच मुख्य पीक आहे. त्यामुळे शेती आणि मजुरी केल्याशिवाय उदरनिर्वाह करता येत नाही. रामचंद्र माने व ताराबाई माने हे शेतकरी दांपत्य त्यापैकीच एक.

भुतोंडे गावात थोडी शेती व गाईगुरे पाळून इतरांच्या शेतांवर मजुरी करीत माने दांपत्याने प्रशांत व प्रवीण अशा दोन मुलांना स्थानिक शाळेत शिकवले. शालेय जीवनापासून सतत धडपड करणारा प्रशांत शेतीत उदरनिर्वाह होणार नसल्याचे पाहून पुढे मुंबईला गेला. मुंबईत सतत व्यस्त असलेल्या प्रशांतला टाळेबंदीच्या काळात गावात एकटेपण आले.

‘आईवडिलांना नवं घर देण्याचे माझे स्वप्न होतेच. लॉकडाउनमध्ये मीच पुढाकार घेतला. यू-ट्यूब पाहून आणि स्थापत्य अभियांत्रिकीची पुस्तके वाचून मूळ गोष्टी समजून घेतल्या. स्वतःच माझ्या हाताने बंगला बांधण्याचा निर्णय घेतला. मी गवंडी झालो. नको म्हणत असतानाही आईवडील बिगारी बनले. मग, आम्ही सतत दोन वर्षे राबलो.

आता १,३५० फुटांचा प्रशस्त बंगला बांधला आहे. त्यासाठी दहा लाख रुपये खर्च केले आहेत. कॉलम, बिम भरणे, स्लॅब, प्लॅस्टर अशी कामे मी केली. प्लंबिंग, फॅब्रिकेशन मीच केले. आता फरशी आणि रंगकामही मी करणार आहे,’ असे प्रशांतने सांगितले.

आम्ही शेतकऱ्यांची मुलं सतत लढत असतो

‘झोपडीत, मातीच्या घरात कोणत्याही शेतकरी आईवडिलांना आपल्या मुलाने टुमदार बंगला बांधावा, असे स्वप्नं असते. शेतकऱ्यांच्या मुलांनी जगभर भरारी घ्यावी. पण आपली शेती, गाव आणि आईवडिलांना कधीही विसरू नये, असे मला वाटते. शेत असो की व्यवसाय; आम्ही दऱ्याखोऱ्यांतील शेतकऱ्यांची मुलं मुळात सतत लढत असतो.

त्यामुळे बंगला पूर्ण होताच मी पुन्हा गाव सोडून मुंबईला नव्याने दुसरा कोणता तरी बिझनेस करणार आहे. काय करायचे हे ठरलेले नाही. मात्र लढत राहायचे आहे,’ असा संकल्प प्रशांत बोलून दाखवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.