पुणे : संस्कृतचे व्याकरणकार महर्षी पाणिनी यांच्या ‘अष्टाध्यायातील’ व्याकरणीयसूत्र तब्बल अडीच हजार वर्षांनी उलगडल्याचा दावा केंब्रिज विद्यापीठाच्या एका संशोधकाने केला आहे. शब्दनिर्मितीच्या सूत्रांकडे एका वेगळ्याच परिभाषेतून पाहणारे हे संशोधन डॉ. ऋषी राजपोपट यांनी केले असून, संशोधनाची व्याप्ती आणि मर्यादांवर संस्कृत भाषा अभ्यासकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. या संशोधनाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.
- पार्श्वभूमी काय?
इसवीसन पूर्व सातव्या शतकात महर्षी पाणिनींनी ‘अष्टाध्यायी’ नावाचा व्याकरण ग्रंथ लिहिला. ज्याआधारे शब्दनिर्मितीची प्रक्रिया चार हजार सूत्रांमध्ये सांगितली आहे. यातूनच संस्कृतचे उत्तम व्याकरण आणि कोश निर्माण झाले आहे. प्रत्येक शब्दाच्या निर्मितीसाठी पाणिनींनी काही सूत्र निश्चित केली आहे. याबद्दल सांगताना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातील संशोधक शैलेश शिंदे सांगतात, ‘‘एखाद्या शब्दाच्या निर्मितीसाठी एकाचवेळी दोन सूत्र लागू पडत असल्यास, नंतर येणारे किंवा शेवटचे सूत्र गृहीत धरावे असे म्हटले जाते. त्यासाठी पाणिनींनी ‘विप्रतिषेधे परं कार्यम्।’ ही परिभाषा निश्चित केली आहे. त्यावरच राजपोपट यांचे संशोधन आहे.’’
- डॉ. राजपोपट यांचा दावा
‘विप्रतिषेधे परं कार्यम्।’ या परिभाषेचा विद्वानांनी चुकीचा अर्थ काढल्याचा दावा डॉ. राजपोपट यांनी केला आहे. आपल्या शोधनिबंधात ते म्हणतात, ‘‘एकाचवेळी दोन सूत्रे लागू होत असल्यास, क्रमाने नंतर येणारे सूत्र गृहीत धरावे, हा महर्षी कात्यायनांनी काढलेला अन्वयार्थ चुकीचा आहे. सूत्रांच्या क्रमांकाऐवजी उजव्या बाजूच्या शब्दासाठी जे सूत्र लागू होईल, तेच गृहीत धरावे, असे पाणिनींचे म्हणणे होते. असे गृहीत धरले तर अनेक शब्दांचे अन्वयार्थ या सूत्राने लागतात.’’
- संशोधनाचे वेगळेपण
पाणिनींच्या परिभाषेचा डॉ. राजपोपट यांच्याप्रमाणे अर्थ लावल्यास सूत्रांचा क्रम लक्षात ठेवण्याची गरज नाही. उजव्या बाजूच्या शब्दाला (प्रत्यय) जे सूत्र लागेल, त्याप्रमाणे शब्द तयार होईल. डॉ. राजपोपट यांचे संशोधन सर्वच शब्दांना आणि सूत्रांना लागू होते का? याबद्दल अजून अस्पष्टता आहे. त्यामुळे त्यांचा दावा पूर्ण सिद्ध झाला आहे, असे म्हणता येणार नाही. त्याशिवाय तो स्वीकारता येणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- संस्कृत आणि संगणक
संस्कृत भाषेला शास्त्रशुद्ध भाषा असे म्हटले जाते. तिच्या प्रत्येक शब्दाच्या निर्मितीमागे एक सूत्र आहे. महर्षी पाणिनी, महर्षी कात्यायन आणि महर्षी पतंजलींनी निर्माण केलेल्या संस्कृत भाषा ग्रंथावर आणि सूत्रांवर आज दोन हजार वर्षानंतरही संशोधन चालू आहे. पाणिनींची ही सूत्रे संगणकाची भाषा (कोडिंग) निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरली आहे. ‘संस्कृत कॉँप्यूटेशनल लिंग्विस्टिक’ हा अभ्यासक्रम जगभरात अभ्यासला जात असून, भारती तंत्रज्ञान संस्था मुंबई, हैदराबाद विद्यापीठपासून ते इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात या संबंधी संशोधन होत आहे.
‘‘पाणिनींच्या परिभाषेचा परंपरेने लावलेल्या अर्थापेक्षा भिन्न अर्थ सांगण्याचा प्रयत्न डॉ. राजपोपट यांनी केले आहे. त्यांनी काही उदाहरणे देऊन ते सिद्ध केले आहे. निश्चितच त्यांचे संशोधन कौतुकास पात्र आहे. पण, जोपर्यंत हा नवा अर्थ सर्व रूपसिद्धीच्या प्रक्रियांमध्ये सिद्ध होत नाही. तोपर्यंत तो निरपवादपणे स्वीकारता येणार नाही.’’
- डॉ. सरोज भाटे, ज्येष्ठ संस्कृत व्याकरणतज्ज्ञ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.