पुणे : कॅनडामध्ये व्यवस्थापनशास्त्रासह अभियांत्रिकी शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. तेथील महाविद्यालये सप्टेंबरमध्ये सुरू होत असल्याने आतापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांची व्हिसाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र येणाऱ्या जानेवारी आणि मार्च मधील बॅचसाठी अजूनही अनिश्चितता कायम आहे.
भारत सरकारने जरी कॅनडियन नागरिकांसाठी व्हिसा बंद केला असला तरी कॅनडा सरकारने त्यांच्या व्हिसाबाबत कोणतेही धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यात भारतातील कॅनडियन दूतावासाने सर्व प्रक्रिया थांबविल्याने जानेवारी किंवा मार्चमध्ये कॅनडात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी मदत करणाऱ्या स्टडी स्मार्ट या संस्थेचे ऑपरेशन मॅनेजर झोहेब सय्यद सांगतात, ‘‘अमेरिकेच्या तुलनेत साधारण २० टक्के विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षणासाठी जातात. यात प्रामुख्याने व्यवस्थापनशास्त्रातील शिक्षणाला विद्यार्थी पसंती देतात.
सप्टेंबरच्या सत्रातील महाविद्यालये सुरू झाल्याने सर्वच विद्यार्थ्यांची व्हिसा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता खरी अडचण ही जानेवारी सत्रातील विद्यार्थ्यांची आहे. सध्या तिथे असलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीच अडचण नसून, ते दैनंदिन व्यवहारांत व्यस्त आहेत.’’ देशभरातून दरवर्षी दोन लाखाहून अधिक विद्यार्थी कॅनडात शिक्षणासाठी जात असल्याचा प्राथमिक आकडा आहे. बहुतेक करून पंजाबमधील विद्यार्थी कॅनडात शिक्षणासाठी जातात.
पर्यटकांच्या सहली रद्द
अमेरिकेबरोबरच कॅनडालाही पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. टोरोंटो, मॉन्ट्रियल, क्यूबेक सिटी, व्हँकुव्हर, नायग्रा फॉल्स, व्हँकुव्हर बेट, कॅनेडियन रॉकीज, ब्रिटिश कोलंबियाची ओकानागन व्हॅली, चर्चिल आदी ठिकाणी पर्यटक भेट देतात. नुकतेच कोरोनानंतर कॅनडातील पर्यटनाला सुरवात झाली होती. पण तानलेल संबंध आणि कॅनडाची भारताबद्दलच्या भूमिकेमुळे सहली रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही सहली पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दहशतवाद हा एका देशापुरता मर्यादित नसून तो वैश्विक आहे. जो देश दहशतवाद्यांना थारा देतो तिथे आम्ही जाणार नाही. म्हणून केसरीने कॅनडातील सर्व आगामी सहली रद्द केल्या आहेत. आमच्या दृष्टीने देश प्रथम आहे.
- झेलम चौबळ, संचालक, केसरी टूर्स
सप्टेंबरच्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या व्हिसाचे काम झाले आहे. आपण जरी कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा नाकारत असलो, तरी कॅनडा सरकारने आपल्या विद्यार्थ्यांसदर्भात कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यांची अर्थव्यवस्थेला परदेशी विद्यार्थ्यांचा मोठा आधार असून, ते लगेचच कोणात निर्णय घेतील असे वाटत नाही.
- दिलीप ओक, ओक ॲकॅडमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.