अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी शेरकरांवर गुन्हा दाखल; सोशल मीडियात होतेय तुफान चर्चा!

Sherkar-Borhade
Sherkar-Borhade
Updated on

ओझर (पुणे) : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचे प्रकरण चांगले गाजत आहे. या प्रकरणाची सोशल मीडियात खूप चर्चा सुरू आहे. या प्रकरणी आता शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुकमध्ये अनधिकृतपणे मनोरुग्णांची संस्था चालवत असलेल्या अक्षय मोहन बोऱ्हाडे या तरुणाला शेरकर यांनी बुधवारी (ता.२७) मारहाण केली. घरी बोलवून मारहाण केल्याचा आरोप अक्षयने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला होता. 

त्यानंतर माध्यमांशी बोलताना शेरकर म्हणाले की, सदर संस्थेत राहणाऱ्या मनोरुग्णांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी होत नसून त्यामध्ये नव्याने काही मनोरूग्ण दाखल होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी बोऱ्हाडेने मंचर येथून एक आजारी मनोरुग्ण आणला असल्याची माहिती मिळाली. 

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने गावाबाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश देऊ नये, असे सूचित करण्यासाठी काही ग्रामस्थांनी बोऱ्हाडेला माझ्या घरी बोलावले. मात्र, बोऱ्हाडेने ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून न घेता अरेरावीची उत्तरे देत तेथून निघून गेला. आणि फेसबुकच्या माध्यमातून मी त्यास मारहाण केली असे सांगितले.

बोऱ्हाडे म्हणाले की...
संस्थाचालक अक्षय बोऱ्हाडे याने फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे की, ''गेल्या तीन वर्षांपासून मी आणि माझे कुटुंबीय या संस्थेच्या माध्यमातून समाजातील निराधार तसेच मनोरुग्णांची सेवा करत आहेत. त्यांना आधार देण्याचे काम करत आहे. मात्र, काही समाजविघातक प्रवृ्त्ती असलेल्यांना ते सहन न झाल्यामुळे मला मारहाण केली.''

दरम्यान, या प्रकरणी राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनीही आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार नितेश राणे यांनी अक्षय बोऱ्हाडेला पाठिंबा दर्शवत आपण त्याच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. शिवभक्ताला केलेली मारहाण खपवून घेणार नसल्याचा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.

तसेच प्रामाणिक शिवभक्ताला सत्तेची नशा चढलेल्या व्यक्तीकडून मारहाण केली जाते. वरून त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली जाते. त्यामुळे या घटनेकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. आरोपी हा कोणत्या जातीचा, पक्षाचा, कारखानदाराचा किंवा मोठ्या घरचा आहे म्हणून कोणताही मुलाहिजा ठेवला जाऊ नये. तसेच बोऱ्हाडेच्या सुरक्षेची जबाबदारीही पोलिसांनी घ्यावी, अशा सूचना संभाजीराजे छत्रपती यांनी केल्या आहेत. 

तसेच अक्षय बोऱ्हाडेसारखा शिवप्रेमी आमचा अभिमान आहे. त्याने असंख्य लोकांचे अश्रू पुसले आहेत आणि आज त्याच्याच डोळ्यात अश्रू येणे हे वेदनादायी आहे. पोलिसांनी कारवाई करावी. तो एकटा नाही, हे लक्षात घ्या. आमचं लक्ष आहे. नाहीतर हर हर महादेव होणारच! अशा आशयाचे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.