पुणे : गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळी घेऊन येणाऱ्या वाहनचालकांकडून पैसे वसूल केल्याप्रकरणी गुंड बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापुर्वीच आंदेकर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे.
याप्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय 65), सागर थोपटे (दोघे रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गौरव सिद्धू सारवाड (वय ,24 रा. संभाजीनगर, धनकवडी) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील नागझरी नाल्याजवळ अल्पना चित्रपट गृहासमोर बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा आहे. या दर्ग्यासमोरील मोकळ्या जागेत मासळी बाजार भरतो. या मासळी बाजारात दररोज मोठ्या प्रमाणात वाहने मासे घेऊन येतात. दरम्यान, आंदेकर व त्याच्या साथीदाराकडून तेथे अनाधिकृत वाहनतळ सुरू केला आहे. त्यांच्याकडून छापलेल्या पावत्या वाहनचालकांना देऊन त्यांच्याकडून पैसा वसूल करीत होते.
या भागात दररोज साडेतीनशे ते चारशे वाहने लावण्यात येतात. वाहनचालकांना धमकावून दररोज साडेतीन ते चार हजार रुपये खंडणी स्वरुपात उकळण्यात आले. दरमहा बेकायदा वाहनतळातून एक लाख रुपये आंदेकर आणि साथीदार उकळत होते, असे सारवाड याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा समर्थ पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान, व्यापारी पेठेत दहशत तसेच एका तरूणाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडू आंदेकरसह साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.