दौंड - दौंड येथे रेल्वेचा शिकाऊ उमेदवार किशोर चौगुले याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी रेल्वेचे विभागीय सहायक यांत्रिकी अभियंता यांच्यासह एकूण तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च दाबाच्या वीज वाहक तारेचा झटका बसून किशोर चौगुले याचा मृत्यू झाला होता.
दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी या बाबत माहिती दिली. किशोर अजय चौगुले (वय २०, रा. डोणगाव, उत्तर सोलापूर) हा दौंड शहरातील रेल्वे कॅरेज अॅण्ड वर्क्स विभागाच्या रूटीन ओव्हरहॅाल शेड मध्ये ४ जुलै रोजी इंधनाच्या रिकाम्या टॅंकरवर वेल्डिंग करीत असताना त्यास उच्च दाबाच्या वीजवाहक तारेचा झटका बसला होता. शरीर भाजण्यासह मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याच्यावर दौंड येथे प्रथमोपचार करून सोलापूर येथील रूग्णालयात दाखल केले असता १९ जुलै रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणात फिर्याद देण्यास कोणी पुढे न आल्याने दौंड लोहमार्ग पोलिसांनी या प्रकारणात स्वतःहून फिर्यादी होऊन सुरवातीला अपघात दाखल केला होता.
दरम्यान, किशोर चौगुले याचा भाऊ ओंकार अजय चौगुले (रा. उत्तर सोलापूर) याने या प्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार विभागीय सहायक यांत्रिकी अभियंता हनमंतप्पा एन. नाटेकर, पर्यवेक्षक असीफ रझा व अभियंता शंकर पासवान (तिघे रा. दौंड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही अधिकार्यांनी हयगय आणि निष्काळजीपणाने किशोर चौगुले यास जोखमीचे काम सांगून अती उच्च दाब असलेल्या वीजवाहक तारेच्या खाली रेल्वे वॅगनवर वेल्डिंगचे काम सांगितले होते. सदर काम करत असताना त्याला झटका बसून कालांतराने मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
रेल्वेच्या तिन्ही अधिकार्यांच्याविरूध्द भारतीय दंड विधान कलम ३०४ (अ), ३३७, ३३८ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.