पुणे : पुणे धर्मप्रांताचे सातवे बिशप म्हणून जॉन रॉड्रीग्स यांचा बुधवारी २४ मे २०२३ रोजी सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल येथे दीक्षाविधी होईल. पोप फ्रान्सिस यांनी मुंबई सरधर्मप्रांताचे सहाय्यक बिशप जॉन रॉड्रिग्स (५६) यांची पुणे धर्मप्रांताचे नवे बिशप म्हणून नेमणूक केली आहे.
विद्यमान बिशप थॉमस डाबरे (७७) यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर २५ मार्च रोजी या नेमणूकीची जाहीर घोषणा करण्यात आली होती. व्हॅटिकनच्या कॅनन लॉनुसार बिशपांचे निवृत्ती वय ७५ आणि कार्डिनलचे निवृत्ती वय ८० वर्षे असते.
मराठी संत वाड्यमयाचा, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा गाढा अभ्यास असणाऱ्या बिशप थॉमस डाबरे यांच्याविषयी इथे वेगळी माहिती देण्याची गरज नाही. त्यांनी याच विषयावर डॉक्टरेट मिळवली आहे.
बर्नार्ड बाईदर-लिन्डेन हे पुणे धर्मप्रांताचे पहिले बिशप (१८८७ ते १९०७) होते. अव्वल ब्रिटिश आमदानीच्या काळात प्रोटेस्टंट मिशनरी भारतात १८१३ साली आले, त्यातुलनेत कॅथोलिक आणि जेसुईट धर्मगुरु उशिरा पोहोचले.
आताही प्रकाशित होणाऱ्या आणि त्यामुळे मराठीतील सर्वाधिक दीर्घायुष्य लाभलेल्या 'निरोप्या' या मासिकाचे संस्थापक (साल १९०३) असलेले जर्मन जेसुईट आर्चबिशप हेन्री डोरिंग हे पुण्याचे दुसरे बिशप (१९०७ ते १९२१ आणि १९२७ ते -१९४९) होते. मध्यंतराच्या काळात पहिल्या महायुद्धामुळे ब्रिटिश भारतात ते स्वतः जर्मन असल्याने परदेशात अडकले होते.
बिशप अँड्रयू डिसोझा यांची कारकिर्द १९४९ ते १९६७ या काळातली तर बिशप विल्यम गोम्स हे १९६७ ते १९७६ या काळात या धर्मप्रांताचे प्रमुख होते. व्हॅलेरियन डिसोझा १९७७ ते २००९ या काळात बिशप होते. `क्रुसाभोवतालचा मराठी समाज' या माझ्या पुस्तकात पहिलेच प्रकरण त्यांच्यावर आहे. आम्हा दोघांचं - जॅकलिनचे आणि माझे - लग्न त्यांनी `आय डू, आय डू" या शपथा वदवून घेऊन, अंगठ्या, चांदीचे जोडवे आणि मंगळसूत्राला आशीर्वादित करुन लावले.
त्याकाळात पुणे धर्मप्रांताची सीमा खानदेशातील नंदुरबार पासून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत होती आणि या डायोसिसमध्ये सतरा महसूल जिल्हे होते. बिशप व्हॅलेरियन यांच्या कारकीर्दीत पुणे डायोसिसचे दोनदा विभाजन झाले, या धर्मप्रांतातून नंतर नाशिक आणि सिंधुदुर्ग धर्मप्रांत उदयास आले. आता पुणे डायोसिसमध्ये पुणे, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यांचा आणि फक्त कोल्हापूर शहराचा समावेश होतो.
आपल्या धर्मप्रांतात असलेल्या सर्व कॅथोलिक देवळांचे, शाळा-कॉलेजांचे, अनाथालय, वृद्धाश्रम , दवाखाने यासारख्या विविध सामाजिक संस्थांचे बिशप हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रमुख असतात. बिशप थॉमस डाबरे हे २००९पासून आतापर्यंत २०२३ पर्यंत बिशप आहेत. पोप फ्रान्सिस यांचे एक महत्त्वाचे सल्लागार असलेले मुंबईचे कार्डिनल ओसवाल्ड ग्रेशियस हे या दीक्षाविधीचे पौराहित्य करतील.
या प्रसंगी कार्डीनल ग्रेशियस विधिपूर्वक नूतन बिशपांना त्यांच्या अधिकृत आसनाकडे - म्हणजे कॅथेड्रॉकडे – नेतील. व्हॅटिकन सिटीचे - पोप फ्रान्सिस यांचे - भारतातील राजदूत आणि प्रतिनिधी आर्चबिशप लिओपोल्डो जीरेली (Archbishop Leopoldo Girelli ) या प्रसंगी पोपमहाशयांचे संदेश वाचतील.
या दीक्षाविधीला भारतातील पंधरा बिशप्स, दोनशे धर्मगुरू यांच्यासह अनेक धर्मभगिनी, भाविक आणि इतरजण उपस्थित राहणार आहेत. पवित्र मिस्साविधीनंतर पूना धर्मप्रांताचे १४ वर्षे प्रमुख असलेल्या मावळते बिशप थॉमस डाबरे यांचा निरोप समारंभ होईल. त्यानंतर गोव्याचे कार्डीनल फिलिप नेरी फेराव नूतन बिशप रॉड्रीग्स यांचा सत्कार करतील.
नवनिर्वाचित बिशप जॉन रॉड्रीग्स यांचा मुंबईत २१ ऑगस्ट १९६७ रोजी जन्म झाला. विशेष म्हणजे त्यांचे थोरले दोन बंधूसुद्धा धर्मगुरू आहेत. त्यापैकी सर्वांत थोरले बंधू फादर साव्हियो रॉड्रीग्स हे मुंबई सरधर्मप्रांतात धर्मगुरू आहेत तर दुसरे बंधू फादर लुक रॉड्रीग्स हे मुंबई जेसुईट (येशुसंघीय) प्रांताचे सदस्य आहेत.
बिशप रॉड्रीग्स सध्या मुंबईतील बांद्रा येथील बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ माऊंटचे रेक्टर म्हणून कार्य पाहत आहेत. बिशप जॉन रॉड्रीग्स यांचा धर्मगुरूपदाचा दीक्षाविधी १८ एप्रिल १९९८ रोजी झाला, त्यानंतर मुंबईत माहिम येथे सेंट मायकल चर्चचे सहाय्यक धर्मगुरू म्हणून त्यांची नेमणूक झाली. मुंबईचे आर्चबिशप यांचे सचिव म्हणून १९९९ ते २००० या काळात त्यानीं कार्य केले. मुंबईतल्या सेंट पायस दहावे कॉलेजात २००२ पासून नऊ वर्षे ते सिस्टेमॅटिक थियॉलॉजीचे प्राध्यापक होते.
रॉड्रीग्स यांनी मुंबई सरधर्मप्रांताच्या धर्मगुरूच्या कौन्सिलचे सचिव म्हणून २०१०-१३ या काळात, सेंट पायस दहावे कॉलेजच्या स्टडीजचे डीन म्हणून २०११-१३ या काळात आणि सरधर्मप्रांताच्या `विश्वासाचे वर्ष' चे समन्वयक म्हणून २०१२-१३ या काळात कार्य केले. सेंट पायस दहावे कॉलेजचे रेक्टर ते २०१३ पासून ते रेक्टर होते. बिशप रॉड्रीग्स यांनी रोम येथील पोंथिफिकल लॅटरन युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवली आहे. मुंबईचे सहाय्यक बिशप म्हणून त्यांचा २९ जून २०१३ रोजी दीक्षाविधी झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.