पुणे : झोपेतून जागं झालं आणि आपलं सरकार गेलं, त्यामुळे ब्राह्मण समाजासाठी सुरु केलेलं अमृत महामंडळ सुरु झालं नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. अमृत महामंडळाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याची संपूर्ण फाइलसुद्धा पुर्ण झाली. उद्धव ठाकरेंना याबाबत अनेक पत्रं लिहिली पण त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही असंही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एका कार्यक्रमात व्यक्त केले.
उद्धव ठाकरेंना आतापर्यंत अनेक प्रश्नांबाबत पत्रे लिहिली, मात्र त्यावर उत्तरं मिळाली नाही. गेल्या दीड वर्षातला अनुभव आहे की, उध्दवजींना पत्र दिले की त्याचे काहीही उत्तर येत नाही, ते कदाचीत कोविडमध्ये व्यस्त असतील असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षण न मिळाल्यानं समाजासाठी उपयोगी पडतील अशा काही योजना करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सारथी योजनाही होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने सारथीचे वाटोळे केल्याचं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं.
कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळून मराठा आरक्षणप्रश्नी येथे पाच जूनला मोर्चा काढणारच असल्याची घोषणा आमदार विनायक मेटे यांनी रविवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान याबाबत विचारले असता, ''जे काही सकारात्मक आणि रचनात्मक आहे त्यात आम्ही पूर्ण ताकदीसह सहभागी होऊ'' असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी मेटेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
''मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या रस्त्यावरचे आंदोलन सामुहिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरेल'' असा इशारा दिला छञपती खासदार संभाजी राजे भोसले यांनी दिला. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप भेटीसाठी वेळ न दिल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, ''मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी राजेंनी त्यांचं मत मांडलं, मेटेंनी त्यांचं मत मांडलं. 'हा विषय माझा नाही, राज्याचा आहे', असं पंतप्रधान मोदींचे म्हणणं आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची भेट झाली नाही.''
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान, यावरून महाविकास आघाडी सरकारचे हम करे सो कायदा असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांनी म्हटलं की, शेवटच्या वर्षाची परीक्षा महत्वाची असते. त्यावर पुढच्या ऍडमिशन आणि नोकऱ्या अवलंबून असतात. त्यामुळे कोविडचा विचार करून 10, 12 आणि शेवटच्या वर्षांची परीक्षा व्हाव्यात. सरकार कोणाला विचारत नाही. त्यांचे हम करे सो कायदा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.