पुणे : भाजपची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाल्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पहिली बैठक पार पडली. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्याच, पण जे पदाधिकारी व्यवस्थित काम करणार नाहीत त्यांचा राजीनामा घेऊ असा इशाराही बैठकीत दिला.
भाजपच्या शहराध्यक्ष धीरज घाटे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस या पदावरील पदाधिकाऱ्यांच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली.
या नियुक्त्यांवरून पक्षातील आमदार व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेल्या नाराजीची भाजपमध्ये अजूनही चर्चा सुरु आहे. असे असताना आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, प्रदेश सचिव वर्षा डहाळे, माजी खासदार अमर साबळे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी यावेळी उपस्थित होते.
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घरोघरी फिरून याची माहिती दिली पाहिजे. तुम्ही तरुण आहात पुढील वर्षभर संघटनेसाठी जास्ती जास्त वेळ द्या, त्याची नोंद ठेवा, दर तीन महिन्याने या कामाचे आम्ही आॅडिट करू.
जे चांगले काम करणार नाहीत, त्यांचा राजीनामा घेऊ. आपल्याला महाविजय २०२४ मध्ये पुण्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळवायचे आहे. पक्षात काम नाराजी असेल, कोणाचे काही पटले नाही तर त्यांच्याबद्दल बाहेर बोलू नका. त्यांची थेट तक्रार फडणवीस, चंद्रकांत पाटील किंवा माझ्याकडे करा. शहरातील आमदारांची कामगिरी सुधारणे आवश्यक आहे, अशी सूचना बावनकुळे यांनी केल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
‘‘पक्षाच्या कार्यकारिणीत नवे व उत्साही कार्यकर्ते आहेत, त्यांनी जास्तीत जास्त वेळ संघटनेसाठी द्यावा. आपल्या कामाच्या नोंदी ठेवा. महाविजय २०२४ साठी आपल्याला पूर्ण ताकदीने उतरायचे आहे. महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत ५१ टक्के मत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा असे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले. ही बैठक चांगल्या पद्धतीने पार पडली.’’
- धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.