राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील बंडाळीमुळे हे सरकार जाणार की रहाणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
इंदापूर - राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील बंडाळीमुळे हे सरकार जाणार की रहाणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सरकार पडले तर सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पद जाणार की भाजप प्रणित सरकार सत्तेवर आल्यास माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मंत्री पद मिळणार याची खमंग राजकीय चर्चा सुरू असून कार्यकत्यांनी पैजा लावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे दत्तात्रय भरणे हे कट्टर समर्थक असून त्यांनी दोन वेळा राज्यात साडे एकोणीस वर्ष मंत्रीपद भोगलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला आहे. प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष, नंतर आमदार, तर त्यानंतर मंत्रीमंडळात सहा खात्यांचे राज्य मंत्री पद भूषविणारे दत्तात्रय भरणे यांनी तालुक्याच्या विकासासाठी विक्रमी निधी आणला. रस्ते, वीज व पाण्यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. दलीत, अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत त्यांनी निधी पोहोचवला आहे.
इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडीसह तालुक्यातील आठ गावांचा पाण्याचा प्रलंबित बहुचर्चित प्रश्न सोडविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यावर सही घेवून त्यावर निधी देखील टाकला. त्यामुळे भरणे यांचे राजकीय पारडे जड झाले. मात्र, तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते भरणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. तालुक्यात आणलेल्या विक्रमी निधीची परिक्षा आगामी निवडणुकात होणार असून त्यासाठी सत्तेवर असणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्ता बदल झाल्यास तालुक्यास आणलेल्या विक्रमी निधीचे तसेच लाकडी निंबोडी पाणी पुरवठा योजनेचे काय होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. भरणे यांनी आपल्या कामाचा ट्रेलर दाखविला आहे. मात्र त्याचा संपूर्ण चित्रपट होण्यासाठी त्यांना सध्या अडचण निर्माण झाली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपवासी हर्षवर्धन पाटील यांना निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. मात्र, त्यानंतर नाउमेद न होता त्यांनी वीजजोड तोडण्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनास शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सहकार चळवळ संवर्धनासाठी त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अकरा वेळ भेट घेवून सहकाराचे प्रश्न मांडले. त्यामुळे केंद्रीय सहकार मंत्रालयाची निर्मिती होवून सहकाराचे प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली. भाजपमध्ये आल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींशी त्यांनी चांगला संपर्क ठेवला आहे. मात्र, राज्यात भाजपची सत्ता नसल्याने त्यांना एकही सत्ता किंवा लाभाचे पद अद्याप मिळाले नाही.
त्यामुळे भाजपची सत्ता आल्यास पश्चिम महाराष्ट्र, तसेच बारामती लोकसभा मतदार संघात ताकद वाढविण्यासाठी भाजपला हर्षवर्धन पाटील यांच्या साडे एकोणीस वर्षाच्या मंत्री मंडळातील कामाचा निश्चित फायदा होणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात आहे. मात्र हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्यातील बेबनाव अद्याप मिटला नाही. एकेकाळी चांगल्या अर्थव्यवस्थापनाचे पुरस्कार पटकावणाऱ्या कर्मयोगी कारखान्याचे अर्थकारण अद्याप चांगले झाल्याचे दिसून येत नाही. त्याचे परिणाम आगामी नगर परिषद व इतर निवडणुकीत निश्चित जाणवणार आहेत. मात्र सध्या तरी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे राजकारणात लंबी रेस का घोडा म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणांचा लाभ निश्चित कोणाला होणारयाकडे राजकीय पक्ष तसेच धुरिणांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.