जुन्नरमधील वादळाचा फटका बसलेले सावरतायेत संसार

unnar
unnar
Updated on

आपटाळे (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात वादळामुळे व पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीतून स्वतःला सावरण्यासाठी बाधित क्षेत्रातील नागरिक प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. 

जुन्नर तालुक्यात बुधवार वादळी पावसाने धुमाकूळ घातला. काले, येणेरे व परिसरातील गावामध्ये आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आंब्याच्या उत्पादनावर या भागातील अर्थकारण अवलंबून असते, मात्र आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने अर्थकारण कोलमडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी वादळाने पडलेल्या कैऱ्या गोळा करण्याच्या कामात व्यग्र आहे. शेतात असणाऱ्या चिखलात पाय तुडवत कैऱ्या गोळा करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यांनतर त्या कैऱ्या पाण्याने स्वच्छ कराव्या लागत आहेत. 

या भागातील बहुतांशी ठिकाणी अद्यापही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने पाणी नाही. त्यामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. हे सारे प्रयत्न करून वादळाने पडलेल्या कैऱ्या मिळेल त्या भावात विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. निम्म्या भावातसुद्धा कैरी व्यापारी घेत नसल्याने आंबा उत्पादक हवालदिल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. या उन्मळून पडलेल्या झाडांची तोडणी करून त्या झाडाला असणाऱ्या कैऱ्या देखील हताशपणे गोळा करण्याचे काम शेतकरी करत आहेत. 
       

जुन्नर तालुक्यात जवळपास 1402 घरांचे या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. काही घरांचे पूर्णतः तर काहींचे कमी प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात काही कुटुंबे बेघर झाली आहेत. बेघर कुटुंबाना गावातील ग्रामस्थ सहकार्य करत आहेत. बहुतांशी नागरिकांनी नातेवाईकांच्या घरांचा आसरा घेतला आहे. प्रशासनकडून मात्र पंचनामे केल्याशिवाय मदत मिळत नसल्याने घराची दुरुस्ती करण्याचे काम स्वखर्चाने अनेक ठिकाणी सुरू देखील झाले आहे. लोकडाउनमुळे पैशांची चणचण भासत असल्याने उधारी उसनवारी करून नागरिकांना हे काम करावे लागत असल्याची खंत उच्छिल येथील नुकसानग्रस्त शेतकरी महेंद्र नवले यांनी व्यक्त केली. 
     

अद्यापही आदिवासी भागात बहुतांशी ठिकाणी वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. खामगाव येथे वीजपुरवठा खंडित असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक पावसामुळे ओढ्याला आलेले पाणी पिंपांमध्ये भरून घेऊन चारचाकी वाहनातून घेऊन जात असल्याचे चित्र आहे. उच्छिल व परिसरातील गावात चार दिवसांपासून वीजप्रवाह खंडित असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.   प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले असल्याचे तहसीलदार हणमंत कोळेकर व निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी सांगितले. 

पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचे नुकसान
नारायणगाव :
चक्रीवादळामुळे जुन्नर तालुक्यातील  १४५ गावातील सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रातील फळभाजीपाला पिकांचे नुकसान झाले असुन, याचा फटका २२ हजार ९६० शेतकरी कुटुंबाला बसला आहे. वादळामुळे १ हजार २५९ इमारतीचे नुकसान झाले आहे. या मध्ये घरे, शाळा, उपकेंद्र, समाजमंदिर, सभामंडप, घरकुले, ग्रामपंचायत कार्यालय आदींचा समावेश आहे. लघु व मुख्य वीज वहिनींना जोडणारे ७३३ विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे १८६ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या पैकी आज अखेर १२९ गावांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे. शेती पीके व मालमत्तेचे सुमारे पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके  यांनी दिली.

आमदार बेनके यांनी तालुक्यातील नुकसानीची पहाणी केली. त्यानंतर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी वीज, महसूल व पंचायत समितीचे अधिकारी यांच्या समावेत बैठक घेण्यात आली. या वेळी जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी, वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता एच. सी. नारखडे, तहसीलदार हनुमंत कोळेकर,  गणपतराव फुलवडे, गुलाबराव नेहेरकर, ग्रामोन्नाती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, गटविकास अधिकारी गरीबे आदी उपस्थित होते.

आमदार बेनके म्हणाले ३ जून रोजी दुपारी झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे.वादळामुळे झालेले नुकसान व कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग या दोन्ही संकटाचा सामना शेतकरी व तालुक्यातील जनतेला करावा लागत आहे. वाऱ्याचा वेग जास्त (ताशी ९० ते १०० किलोमीटर) असल्याने फळभाजीपाला पिके व पत्रा छत असलेली घरे, शासकीय इमारती व वीज वितरण कंपनीचे जास्त नुकसान झाले आहे. सुमारे दोन हजार फळ झाडे उन्मळून पडली असून, १ हजार १७७ घरे, ३२ घरकुले, ३१ शाळा, ६ अंगणवाडी, प्रत्येकी तीन ३ ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र ,सभामंडप आदी सुमारे १ हजार २५९ बांधकामाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात प्रथमच शेती पिके व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल(ता.५) पहाणी दौरा केला असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

५७ गावे अंधारात 
कार्यकारी अभियंता नारखडे म्हणाले की, झाडे पडल्यामुळे ७३३ पोल पडल्याने लघू व उच्च वहिनीच्या तारा तुटल्याने १८६ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.३हजार २८४ रोहित्र बंद पडली होती.१५ पथके दुरूस्तीचे काम करत आहेत.१२९ गावांचा वीज पुरवठा पूर्ववत केला असून शिल्लक ५७ गावांचा वीज पुरवठा पुढील तीन दिवसात सुरू करण्याचा प्रयत्न आहे.पाऊस पडत असल्याने कामात अडचण येत आहे.वादळाची पुर्व कल्पना असल्याने ३ जून रोजी वीज पुरवठा बंद ठेवल्याने जीवित हानी टळली आहे.

अजित पवार यांच्याकडून सांत्वन
जुन्नर :
चक्री वादळाचा बळी ठरलेल्या जुन्नरमधील अजय साहेबराव साळुंखे (वय १) याच्या नातेवाईकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांयकाळी भेट घेऊन सांत्वन केले. 

या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सभापती संजय काळे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, नगरसेवक दिनेश दुबे, भाऊ कुंभार, फिरोज पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पापा खोत उपस्थित होते. 

तालुक्यातील शेतपिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार आले होते. ही घटना समजल्यावर त्यांनी जुन्नरला येऊन या कुटूंबाची भेट घेतली. राज्य सरकार निसर्ग वादळात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना  चार लाखाची मदत देते ती तातडीने देण्यात यावी, अशी सूचना त्यांनी तहसीलदारांना केली. तसेच, याशिवाय एक लाखाची मदत देण्यात येईल, आमदार बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली ती संबंधितांच्या वारसांना मिळेल यासाठी कार्यवाही करा, असे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.