Cantonment News : सैनिकांच्याप्रती कृतज्ञता प्रकट करून नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलन कार्यात उस्फुर्तपणे सहभाग घ्यावा

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन २०२३ निधी संकलन शुभारंभप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे बोलत होते.
Collector Ajay More
Collector Ajay MoreSakal
Updated on

कॅन्टोन्मेंट - देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता प्रकट करून सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलन कार्यात शासकीय कार्यालयासह दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, कंपन्या आदीनी मोठ्या प्रमाणात सहभागी उस्फुर्तपणे योगदान देण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन २०२३ निधी संकलन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) युवराज मोहिते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कर्नल स. दै. हंगे, निवृत्त कर्नल समीर कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी मोरे म्हणाले, आपल्या देशाची सीमा सुरक्षित आहे म्हणून आपण समस्त भारतवासी सुरक्षित आहोत. सीमांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या देशातील सैनिक अहोरात्र पाहरा देत असतात. सैनिकांनी देशासाठी दिलेल्या सेवेमुळे आणि त्यांच्या त्यागामुळे देशाचे अस्तित्व आहे. महसूल विभागाच्या वतीने सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्याला प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य राहील.

देशाच्या प्रती सैनिकांचे बलिदान ही खुप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव सर्व नागरिकांना असणे गरजेचे आहे. ध्वजदिन निधी हा माजी सैनिक, युद्धविधवा, इतर माजी सैनिकांच्या विधवा व त्यांचे वारस, माजी सैनिकांचे पाल्य यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि उद्दातीकरणासाठी व कल्याणासाठी खर्च होत असल्याने दिलेल्या उद्दिष्ठापेक्षाही जास्त निधी संकलन करण्यात यावा. ध्वजदिन निधीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रस्ताविकात ले. कर्नल हंगे म्हणाले, पुणे जिल्ह्याला ध्वजदिन निधी २०२२ करीता २ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपये इतके उद्दिष्ट देण्यात होते. त्यापैकी १ कोटी ७४ लाख ५७ हजार ८५२ रुपये इतके उद्दिष्ट साध्य करण्यात आले असून त्याचे प्रमाण एकूण ६७ टक्के आहे.

सन २०२२-२३ मध्ये ध्वजदिन निधीतून माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या विधवा, पाल्य, मुली यांच्याकरिता विविध कल्याणकारी योजनांसाठी १ कोटी ६ लाख २७ हजार ९३८रुपये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. सैनिकी मुलांच्या व मुलींचे वसतिगृहासाठी जवळपास ७६ लाख ६३ हजार ८५८ रुपये खर्च करण्यात आले आहेत.

दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या सैनिकांच्या ८० विधवांना ४२ लाख १० हजार रूपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. माजी सैनिकांच्या कल्याणार्थ विविध योजना राबविण्यात येतात. शासकीय नोकरीत माजी सैनिकांना १५ टक्के आरक्षण आहे.

विधवांच्या मुलांना मोफत वसतीगृह सुविधा पुरविण्यात येते. ध्वजदिन निधी माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठीच खर्च होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सैनिक संघटनांनीदेखील निधी संकलन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात गेल्यावर्षी ध्वजदिन निधी संकलनासाठी उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करुन धनादेश वितरण करण्यात आले.

मागील वर्षी ध्वजनिधी संकलन करताना उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. माजी सैनिकांच्या पाल्यांनी विविध परीक्षांतून, क्रिडाप्रकारातून सर्वोत्तम गुणदर्शन करणाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरव केला गेला. कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातून माजीसैनिक, वीरपत्नी नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

तसेच भाजपा सैनिक आघाडी पुणे अध्यक्ष आनंद ठाकूर, राष्ट्रवादी सैनिक सेल अध्यक्ष दिपकराजे शिर्के, कर्नल कुलकर्णी, कॕप्टन परशुराम शिंदे, माजी सैनिक तुकाराम डफळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.