मंचर (पुणे) : “अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला आणि मी ही मुख्यमंत्री झालो. हा चमत्कार शिवनेरीच्या भूमीतला मी अनुभवला आहे. शत्रू बरोबर कसे लढावे, याची शिकवण उभ्या महाराष्ट्राला वेळोवेळी छत्रपती शिवरायांनी दिली आहे. त्यामुळे मी कोणत्याही संकटाला कधीही घाबरत नाही. कारण या मातीतील तेज आणि प्रेरणा माझ्या बरोबर आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाट केला.
मंचर (ता.आंबेगाव) येथील शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण समारंभ तसेच मंचर ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून २८ लाख रुपये किंमतीच्या व्हेंटिलेटरसह अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (ता.२१) ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. यावेळी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांत अधिकारी सारंग कोडवलकर, सुरेश गोरे, माऊली आबा कटके, देवेंद्र शहा, हर्षद मोरडे, सुरेश भोर, देविदास दरेकर, सुनील बाणखेले, अरुणा थोरात, अरुण गिरे, राजाराम बाणखेले, शिवाजीराव राजगुरू, उपसरपंच धनेश मोरडे, सागर काजळे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे उपस्थित होते.
राम मंदिराचा प्रश्न कोल्डस्टोरेजमध्ये थंड झाला होता, असा टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी भाजपला लावला. ठाकरे म्हणाले, ''शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निमित्ताने या भागात अनेकदा आलो आहे. त्यामुळे या भूमीचा परिसर आणि ताकद मला माहित आहे. राम मंदिराचा प्रश्न मार्गीच लावायचा या जिद्दीने आणि इर्षेने नोव्हेंबर २०१८ मध्ये शिवनेरीवर आलो. येथील माती माथ्याला लावली. शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक घेऊन थेट अयोध्या गाठली. त्यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायलयात दावा सुनावणीला येऊन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह जनतेचे राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात आले. नोव्हेंबर २०१९ मध्ये मी मुख्यमंत्री झालो. त्यानंतर ही मी शिवनेरीवर आलो होतो. या मातीचा चमत्कार मी अनुभवला आहे. कारण या परिसरात शिवरायासह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, हुतात्मा बाबू गेनू, हुतात्मा राजगुरू यांचा पदस्पर्श आहे.''
मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिलीप वळसे पाटील यांनी कोरोनाबाबत केलेली गोड तक्रार वस्तुनिष्ठ आहे. शिवरायांनी तलवारीने शत्रूचा पाडाव केला होता. आता तलवारीची गरज नाही. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता, योग्य अंतर आणि शिस्त पाळून जनतेने महाभयंकर कोरोनाला हद्दपार करावे. वळसे पाटील म्हणाले, ''मंचर शहराच्या वैभवात भर घालण्याचे काम प्रवेशद्वार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याने झाले आहे. अत्याधुनिक रुग्णवाहिका ही जनतेला उपयुक्त ठरेल. कोरोनाविरुद्ध आपल्याला लढाई करायची आहे. त्यासाठी गणेशोत्सव आणि मोहरमच्या काळात जनजागृतीवर भर द्यावा.''
आढळराव पाटील म्हणाले, ''पूर्वी १९७७ मध्ये शिवाजी महाराजांचा लहान पुतळा बसविला होता, पण परवानगी नसल्याने अडचण झाली होती. किसनराव बाणखेले आणि ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. हा प्रकार समजल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मंचरला आले. त्यांनी संघर्ष केल्याने पुतळा कायम ठेवण्यास शासनाला भाग पडले. चौदा महिन्यात दत्ता गांजाळे आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन सव्वा कोटी रुपयांची शिवरायांचा पुतळा आणि प्रवेशद्वार उभे केले आहे. लवकरच चौदा कोटी रुपयांच्या नळ योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.''
सरपंच दत्ता गांजाळे म्हणाले, "शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी मंचरकरांनी आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोलाची साथ दिली. उद्धवसाहेब यांनी वेळ दिला. हा क्षण मंचर शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरेल. मंचर येथे गाथा मंदिर उभारावे, अशी माझी विनंती आहे."
१९७७ मध्ये शिवाजी महाराजांच्या लहान पुतळ्याची स्थापना करणारे माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले, विठ्ठलराव चिखले, रामशेठ थोरात, युवराज बाणखेले, संजय चिखले, दत्ता थोरात तसेच यादवराव पडवळ, गजानन दैने, बबनराव बाणखेले, शिल्पकार सुप्रिया शिंदे-गांजाळे, प्रवीण बनबेरू, वास्तूविशारद रवींद्र गांजाळे, भाऊ निघोट आणि सरपंच दत्ता गांजाळे यांचा सन्मान आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. वसंतराव बाणखेले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन जागृती महाजन यांनी केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.