CNG Gas : ‘सीएनजी’मुळे जीवनाचा ‘प्रवास’ समृद्ध

‘सीएनजी’मुळे केवळ वाहनविश्वातच नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात घडतेय क्रांती.
CNG vehicles
CNG vehiclessakal
Updated on

- प्रसाद कानडे

पुणे - ‘सीएनजी’च्या वापरामुळे केवळ वाहनविश्वातच नव्हे तर त्याच्या वापरकर्त्यांच्या आयुष्यातदेखील क्रांती घडली आहे. हातावर पोट असलेले छोटे रिक्षा व्यावसायिक असो की कारचालक. ‘सीएनजी’च्या वापरामुळे इंधन खर्चात मोठी बचत होत आहे.

परिणामी मुलांचे शिक्षण, घराचे हप्ते आदींसाठी पैसा उपलब्ध होत आहे. ‘सीएनजी’च्या वापरामुळे केवळ ग्राहकच नाही, तर त्याचे संपूर्ण कुटुंब आता एक चांगले आयुष्य जगत आहे. आयुष्याचा प्रवास आता समृद्धीच्या दिशेने होत आहे.

‘सीएनजी’च्या वापरामुळे जीवनात बदलाची अनुभूती घेतलेले रामदास काकडे सांगतात, गेल्या पाच वर्षांपासून मी रिक्षाचा व्यवसाय करीत आहे. रिक्षा व्यवसायातून जेवढे उत्पन्न मिळत होते, त्यातील अर्धा खर्च हा पेट्रोलवर होत होता. घरी जाताना हाती फार काही शिल्लक राहत नव्हते. घरात पाच सदस्य अन् कमविणारा मी एकटाच. अनेक स्वप्ने उराशी बाळगलेली, पण दैनंदिन खर्च भागविताना मेटाकुटीला आलो होतो.

एके दिवशी ‘सीएनजी’वर रिक्षा व्यवसाय करायचा निश्चय केला. ७ ते ८ महिन्यांपूर्वी ‘सीएनजी’वर धावणारी रिक्षा घेतली. रोज साधारणपणे ३०० रुपयांचा ‘सीएनजी’ भरतो. यावर दिवसाकाठी ८० किलोमीटर इतका प्रवास करतो. ‘सीएनजी’चा दर पेट्रोलच्या तुलनेत कमी आहे. शिवाय ‘सीएनजी’ला प्रतिकिलोमागे किमान १० ते १२ किलोमीटरचे अधिकचे मायलेज मिळते. त्यामुळे माझा दोन्ही बाजूंनी फायदा होतो.

‘सीएनजी’मुळे इंधनावर होणारा खर्च कमी झाला आहे. शिवाय चांगले मायलेज असल्याने अधिकचे उत्पन्नदेखील मिळत आहे. यातून आता महिन्याला सुमारे सहा हजारांची बचत होत आहे. या बचतीतून मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे. ‘सीएनजी’मुळे मी केवळ एकटाच नाही तर संपूर्ण कुटुंब आता चांगले आयुष्य जगत आहोत. आमचा प्रवास समृद्धीच्या दिशेने सुरू असल्याने जगण्यात आता आनंद निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

दुचाकीतही आता क्रांती

आशियात सर्वाधिक दुचाकी एकट्या पुणे शहरात आहेत. पुण्यात ३५ लाखांहून अधिक दुचाकीची संख्या आहे. या दुचाकी पेट्रोल अथवा इलेक्ट्रिक ऊर्जेवर धावतात. मात्र आता दुचाकीप्रेमींना आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध होत आहे. बजाज ऑटो लिमिटेड कंपनीने दुचाकीमध्ये ‘सीएनजी’वर धावणारी दुचाकीची निर्मिती केली आहे. जगातील पहिली ‘सीएनजी’वर धावणारी दुचाकी होण्याचा मान यानिमिताने बजाज ऑटो लिमिटेड कंपनीला मिळालेला आहे. लवकरच ही दुचाकी ग्राहकांच्या भेटीला उपलब्ध होईल.

राज्यात ‘सीएनजी’चा प्रवास सुसाट

पुण्यासह राज्यात आता ‘सीएनजी’च्या वापरात वाढ होत आहे. ‘सीएनजी’ची होणारी सहज उपलब्धता, वाहनांना मिळणारे चांगले मायलेज व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत ‘सीएनजी’चे कमी असलेले दर यामुळे वाहनचालक आता इंधन म्हणून ‘सीएनजी’चा पर्याय निवडत आहेत. शिवाय ‘सीएनजी’चा वापर पर्यावरणपूरक असल्याने अशी वाहने वापरणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. आदी कारणांमुळे राज्यात ‘सीएनजी’वरील वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. पर्यायाने सीएनजी पंपांची संख्या वाढत आहे.

पुण्याची स्थिती

  • सुमारे २ लाख २५ हजार (कॅब व खासगी वाहने) - वाहने

  • दीड लाख (पुणे व पिंपरी-चिंचवड) - रिक्षा

  • ६ लाख ७० हजार किलो - रोजची गॅसविक्री

  • ‘पीएमपी’मधील एकूण बस - १६५०

  • ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बस - १२२९

  • ‘पीएमपी’ बससाठी वापर (दररोज) - ८४ हजार किलो

  • सीएनजी पंप - १२०

अर्थकारण

  • ४ किलो - रिक्षाची सीएनजी टाकी क्षमता

  • ३० किमीचा प्रवास - १ किलोमध्ये

  • ८३. ५० रुपये - प्रतिकिलो सध्याचा सीएनजी दर

  • ५० ते ७० किमी - रोजचा वापर

  • पाचशे ते सातशे रुपये - रिक्षाचालकांचे सरासरी उत्पन्न

‘सीएनजी’च्या वापरामुळे इंधन खर्चात बचत होत आहे. पूर्वी इंधनावर जास्त खर्च करावा लागत होता. आता सीएनजी तुलनेने स्वस्त आहे. शिवाय रिक्षाला चांगले मायलेजदेखील मिळत आहे. त्यामुळे आता खर्च वगळून चांगली बचतदेखील होत आहे.

- राकेश पवार, घोरपडी, रिक्षाचालक

डिझेलच्या तुलनेत सीएनजी असलेल्या वाहनावर व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यामुळे इंधन अधिक खर्ची पडते. पूर्वी डिझेलचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर होत असे. शिवाय त्याचा आर्थिक फटकादेखील बसत होता. आता ‘सीएनजी’मुळे इंधनावरचा खर्च तुलनेने कमी झाला आहे.

- सोहन शेख, हडपसर, कॅबचालक

‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या १२२९ बस आहेत. येत्या काही महिन्यांत ५०० ‘सीएनजी’वर धावणाऱ्या नवीन बसचा समावेश होणार आहे. इलेक्ट्रिक बसच्या तुलनेत ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसचा वापर करणे अधिक हितावह आहे. ‘सीएनजी’वरची प्रवासी वाहतूक ही इलेक्ट्रिकच्या तुलनेत स्वस्तात होते. त्याचा फायदा ‘पीएमपी’ला होत आहे.

- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.