पुणे - "वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काय केले पाहिजे' या प्रश्नाचं स्वाभाविक उत्तर म्हणजे "पेट्रोल-डिझेल व्यतिरिक्त "सीएनजी'च्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. पण इथे परिस्थिती उलटी आहे. उत्सर्जनासाठी सर्वाधिक कारणीभूत असलेले डिझेल स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे; तर "सीएनजी'च्या सार्वत्रिक विक्रीचा विषय प्रलंबित आहे.
""वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी सोपा व पर्यावरणपूरक पर्याय असलेल्या "सीएनजी'च्या विक्रीला जिल्ह्यातील सर्व पंपांवर परवानगी देण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, ऑईल कंपन्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा'', असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे. दरम्यान, वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी "ग्रीन फ्युएल'ला प्रोत्साहन देण्याची गरज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नफा महत्त्वाचा की नागरिकांचे आरोग्य?
"सर्व पंपचालकांना "सीएनजी' विक्रीची परवानगी मिळावी', याबाबतचे पत्र शहरातील पेट्रोल-डिझेल विक्रेत्यांनी आयुक्त कार्यालयाकडे दिले आहे. पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत चौकशी केली असता जिल्हा प्रशासन या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे; पण "नफा केंद्रित' असलेल्या ऑईल कंपन्यांचा याला विरोध असल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.
सरकारही अनुकूल; मग प्रॉब्लेम काय?
"सध्या कार्यरत असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या पंपांमध्येच "सीएनजी'ही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत' असा आग्रह केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही धरला होता. पुण्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या "महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड'च्या एका कार्यक्रमातच प्रधान यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातच "सीएनजी' पंप सुरू करण्याचा प्रस्तावही पालकमंत्री गिरीश बापट यांनी याच कार्यक्रमात मांडला होता. शहरातील सर्व दुचाकी "सीएनजी'वर आणण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आवाहनही बापट यांनी केले होते.
"सीएनजी'ची गरज..!
- पुण्यामध्ये तब्बल 23 लाख दुचाकी आहेत
- ही वाहने "सीएनजी' इंधनावर धावू लागली तर प्रदूषणाच्या पातळीत घट होईल
- "सीएनजी" पंप सुरू करण्यासाठी किमान पाच ते सहा हजार चौरस फूट जागा लागते
- एवढ्या मोठ्या आकाराची जागा शहरात उपलब्ध असण्याची शक्यता कमी
महापालिका हद्दीत व पाच किलोमीटरच्या परिसरात पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या पंपांवर सीएनजी विक्रीला परवानगी देण्यास कोणतीही कायदेशीर किंवा धोरणात्मक अडचण नाही. पेट्रोल-डिझेल विक्रेत्यांनी जर प्रस्ताव दिला तर आम्ही सर्व संबंधित घटकांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करू.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी
पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी एकत्र विक्री करण्यासाठीचे काही सुरक्षा-विषयक आणि तांत्रिक अटी आहेत. त्याची पूर्तता करणाऱ्या पंपांना सीएनजी विक्रीची परवानगी दिली जात आहे. आम्ही याबाबत सकारात्मक दृष्टीनेच विचार करत असून लवकरच सर्व पंपांचा आढावा घेण्यात येईल.''
- राजेश तुपकर, व्यवस्थापकीय महासंचालक (रिटेल), हिंदुस्तान पेट्रोलियम
शहरामध्ये सर्व पंपांवर सीएनजी विक्रीची परवानगी देण्याची मागणी आम्ही केली आहे. दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे टॅक्सी, बस व ट्रकला सीएनजी सक्ती झाली त्याच धर्तीवर पुण्यातही प्रवासी वाहतूक करणाऱ्या कॅब ऍग्रिगेटर कंपन्यांच्या सर्व वाहनांना सीएनजी सक्ती झाली पाहिजे. ही वाहने सर्वाधिक वेळ रस्त्यांवर धावत असतात. ही वाहने सीएनजीवर चालविली गेल्यास वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण घटविण्यात यश येईल.''
अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन
गेल्या वर्षभरातील दर
दर : डिझेल : सीएनजी
सर्वाधिक : 67.18 : 47.50
सर्वांत कमी : 57.51 : 47.50
सरासरी : 63.16 : 47.50
(सर्व दर प्रतिलिटर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.