पुणे/वडगाव शेरी : मुलीचा बारावीचा निकाल ऐकून वडिलांना आनंद झाला. परंतु कुटुंबीयांसोबत प्रत्यक्ष आनंद साजरा करण्याची वडील वैभव यांची इच्छा अपूर्ण राहिली. कारण गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षात भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाल्याची बातमी धडकली आणि काळे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मूळचे नागपूरचे असलेले वैभव काळे हे पुण्यात कल्याणीनगर येथे राहतात. त्यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. वैभव यांच्या थोरल्या मुलीचा काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागला. त्यांची मुलगी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. ही बातमी समजल्यानंतर वैभव यांना खूप आनंद झाला होता.
त्यांनी दूरध्वनीवरून कुटुंबीयांसोबत तो आनंद साजरा केला. हा आनंद काळे कुटुंबीयांना वैभव यांच्यासोबत प्रत्यक्ष साजरा करायचा होता. परंतु त्या अगोदरच काळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या धाकट्या मुलानेही नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली आहे. मुलाची आवड लक्षात घेऊन त्यांनी त्याला साहसी क्रीडा शिबिरांतही पाठवले होते.
सुरुवातीपासूनच अतिशय धाडसी, परंतु तितकेच मनाने हळवे असलेले वैभव हे अतिशय कुटुंबवत्सल, शिस्तप्रिय म्हणून ओळखले जात होते. लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील आयआयएम येथून एमबीए केले. दरम्यान, संयुक्त राष्ट्राद्वारे गाझा पट्ट्यात सेवा बजावण्यासाठी त्यांची निवड झाली. गाझामध्ये वैभव काळे यांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी (ता. १३) समजले.
त्यांचे पार्थिव भारतात आणण्याकरिता अनेक तांत्रिक अडथळे येत असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून प्रयत्न केले. भारतीय दूतावासाकडून प्रयत्न करण्यात आल्याची माहिती वैभव यांच्या वहिनी आणि मुंबई ‘जीएसटी’च्या सहआयुक्त स्वाती काळे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.