विस्तारासाठी चला महानगरांच्या बाहेर!

विस्तारासाठी चला महानगरांच्या बाहेर!
Updated on

विविध भागांमध्ये स्थापन झालेल्या ‘आयटी पार्क’मुळे पुण्याचा चेहरामोहरा बदलला आहे. पुढील काळामध्ये शहर केंद्रित आयटी क्षेत्राचा विकास आणि विस्तार होणे जवळपास अशक्‍यप्राय आहे. त्यामुळे शहरालगत छोट्या गावांमध्ये, स्थानिक उद्योगांसाठी आणि स्टार्ट अपकरिता पूरक ठरेल, अशा दिशेने माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी व्यवसायवृद्धी करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने काही कंपन्यांनी ‘बेबी स्टेप्स’ घेतल्या आहेत. आता गरज आहे बड्या कंपन्यांनीही ते मनावर घेण्याची! 

‘आयटी हब’ म्हणून पुण्याची ओळख जगभर आहे. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांच्या अपेक्षाही अधिक आहेत आणि त्याची ‘पूर्तता’ करण्यासाठीचा दबावही. पूरक परिसंस्था (इको-सिस्टिम) असल्यामुळे सॉफ्टवेअर इंडस्ट्री पुण्यात आली आणि स्थिरावली. रोजगारनिर्मिती झाली. हिंजवडी आयटी पार्क सुरू झाले. शहराच्या पश्‍चिम भागात अतिप्रचंड वेगाने विकास झाला. आता हाच ‘ट्रेंड’ ग्रामीण भागाकडे ‘शिफ्ट’ होताना दिसेल. 

भारतातील आयटी कंपन्यांकडून कामे करवून घेणे परदेशांतील कंपन्यांना परवडेनासे होत आहे. त्यामुळे शहरांलगतच्या ग्रामीण भागातच नवी केंद्रे सुरू करायची आणि तिथूनच कामे करवून घेण्याची तयारी आयटी कंपन्यांकडून सुरू आहे. जिल्ह्यातून मिळणाऱ्या मनुष्यबळामुळे आणि शहराच्या तुलनेत जागेच्या किमती कमी असल्यामुळे तिथे कार्यालये सुरू करणे आणि काम पूर्ण करून घेणे परवडते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. 

पुण्यासारखे मुख्य शहर सोडून निमशहरी भागात आयटी कंपन्यांचा विस्तार झाल्यास शहरीकरणामुळे उद्भवणाऱ्या समस्या कमी होण्यास मदत होईल. मुख्य शहरात आणि उपनगरांमधील वाहतुकीचा गंभीर प्रश्‍नही त्यामुळे सुटण्यास मदत होईल. पुण्याच्या प्रमुख आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या आयटी प्रोफेशनल्सपैकी बहुतांश मनुष्यबळ हे शहराबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांचे आहे. गावाकडून शहराकडे होणारे हे स्थलांतर थांबवायचे, तर ग्रामीण भागातच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या पाहिजेत. म्हणून फेज एक, दोन, तीन किंवा चार असे शहर केंद्रित विस्तार करण्याऐवजी आयटी कंपन्यांनी जिल्ह्यामध्ये पाय रोवले पाहिजेत. या कंपन्या जिल्ह्यामध्ये पोचल्यानंतर तेथील पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि उपयोग मोठ्या प्रमाणात होईल. त्याचा फायदा निश्‍चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळेल. 

ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबर तेथील स्थानिक उद्योगांनाही भरारी घेता येईल. केवळ तेवढेच नाही, तर स्टार्ट अप कंपन्या स्थापन करणाऱ्या शहरी तसेच निमशहरी आणि ग्रामीण भागातील नवउद्योजकांनाही मोठी संधी उपलब्ध होईल. अनेक स्टार्ट अप सुरू होतात आणि अर्थसाह्य न मिळाल्यामुळे किंवा अद्ययावत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे एक-दोन वर्षांत बंद पडतात. त्यामुळे नवउद्योजकांमध्येही व्यवसायाविषयी अनावश्‍यक भीती निर्माण होते. ती घालवायची असेल, तर बड्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्टार्ट अपला सोबत घेऊन काम केले पाहिजे. 

आयटी क्षेत्राला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी सर्वांत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वाहतूक कोंडी. पुण्याच्या पश्‍चिमेकडे हिंजवडीकडे जाणारे रस्ते असोत किंवा पूर्व भागातील खराडीच्या आयटी पार्ककडे जाणारे रस्ते. शहराच्या कोणत्याही भागातून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि श्रम याची नासाडी बघता आयटी प्रोफेशनल्सची त्यातून सुटका होण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी मिळालेली मंजुरी हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. सार्वजनिक वाहतुकीचे हे माध्यम आयटी प्रोफेशनल्सच्या दृष्टीने अत्यंत आरामदायी आणि चांगले आहे. त्यामुळे हडपसर, सासवड हे मार्गही लवकर मंजूर झाले पाहिजेत. 

‘स्टार्ट अप’ला हवी आयटी कंपन्यांची साथ
पुण्यामध्ये २००१ ते २०१० या दशकामध्ये सुमारे सव्वाशे स्टार्ट अपची स्थापना झाली. त्यातील बहुतांश बिझनेस आणि प्रॉडक्‍टिव्हिटी सॉफ्टवेअर 
 विषयाशी  संबंधित होते. उर्वरित स्टार्ट अप क्‍लाइन्ट डेस्कटॉप सिस्टीम, सॉफ्टवेअर्स टूल्स, डिजिटल या विषयांशी संबंधित होते. गेल्या दोन वर्षांत तरुणाईच्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘स्टार्ट अप इंडिया’ मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुंतवणुकीला पोषक वातावरण, कुशल मनुष्यबळाची सहज उपलब्धता आणि चांगले हवामान या प्रमुख कारणांमुळे पुण्यात स्टार्ट अप क्षेत्राची वाढ होत आहे.

पुण्याने देशभरातील प्रमुख शहरांच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला आहे. दिल्ली, बंगळूरच्या पाठोपाठ मुंबई, पुणे, हैदराबाद ही शहरे स्टार्ट हब म्हणून उदयास येत आहेत. देशातील ‘टॉप २०’ करारांमध्ये सर्व करार हे पुण्यासह पाच प्रमुख शहरांमध्येच झाले आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील सुरवातीच्या फुगवट्यानंतर आता स्टार्ट अपच्या अन्य क्षेत्रांकडे गुंतवणूकदारांनी गांभीर्याने पाहायला सुरवात केली आहे. त्यामध्ये विशेषतः प्रॉडक्‍ट कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. पुण्यामध्ये अशा प्रॉडक्‍ट कंपन्यांची संख्या मोठी असल्यामुळे गुंतवणूकदारांची ओढ पुण्याकडे असेल, यात काही शंकाच नाही. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी पुण्यातील स्टार्ट अपसाठी ‘इन्क्‍युबेशन सेंटर’ सुरू करण्याची गरज आहे. आयटी कंपन्यांकडे असलेली संसाधने, जागा, पैसा आणि मनुष्यबळ कौशल्याची साथ स्टार्ट अपला मिळाली तर नवउद्योजकांच्या प्राथमिक अडचणी दूर होतील आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना बाजारपेठ मिळेल. शहराच्या विकासाच्या आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

मुंबईत येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी होणाऱ्या डीसीएफ परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आयटी तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. त्यांना ऐकण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी या निमित्ताने या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि रुची असणाऱ्या व्यक्तींना मिळणार आहे.

तज्ज्ञ म्हणतात

अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीप्रमाणे पुण्यातही मुबलक टॅलेन्ट, उद्योग आणि शिक्षण संस्था उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांची संख्या आणि सढळ हाताने गुंतवणूक करण्याची वृत्ती मात्र पुण्यात नाही; जी सिलिकॉन व्हॅलीमध्ये दिसते. ही तफावत भरून काढण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील प्रस्थापित कंपन्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे, मात्र त्याचा उपयोग कोण कसा करतो यावर बौद्धिक स्वामित्व हक्क अवलंबून असतात. हे तत्त्व आयटी क्षेत्रालाही लागू पडते. मूलभूत तंत्रज्ञानाच्या विषयांवर आयटी कंपन्यांनी एकत्र आले पाहिजे आणि शिक्षण संस्थांना सोबत घेऊन ‘ॲप्लाइड रिसर्च’वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. संशोधनाला व्यावसायिक पातळीवर कसे यशस्वी करता येईल, यावर विचार व्हावा.
- राम पझेनूर, उपाध्यक्ष, (डिजिटल बिझनेस, एशिया- पॅसिफिक), पर्सिस्टंट सिस्टिम्स

प्रत्येक गावात चोवीस तास वीज आणि ब्रॉडबॅंड इंटरनेटची सेवा उपलब्ध झाल्यास शिक्षण, बॅंकिंग आणि उद्योग क्षेत्राला त्याचा प्रचंड लाभ मिळेल. ४जी इंटरनेटचा वेग गावपातळीवर मिळाला, तर तेथील परिस्थितीचा कायापालट होईल. ग्रामसभांपासून वैयक्तिक शेतकऱ्यांपर्यंत स्थानिक ॲप्लिकेशन्स, तंत्रज्ञानाच्या आधारे शेतमाल विक्री आणि प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे.’’
- विवेक मापारी, संचालक, डेटा इनसाइट इंडिया

आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक महिला बाळंतपणानंतर नोकरी सोडून देतात. बाळंतपणाची रजा तीन ऐवजी सहा महिने केल्यास नोकरी सोडून देणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी होईल. त्याचा फायदा या क्षेत्राला होईल, तसेच अधिकाधिक काम घरून करण्याची सुविधा (वर्क फ्रॉम होम) दिल्यास आयटी पार्ककडे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी होऊन वाहतुकीचा ताण कमी होईल.
- प्रीती रणदिवे, प्रिंसिपल सायन्टिस्ट, केपीआयटी कमिन्स इन्फोसिस्टिम्स

आयटी कंपन्यापुढे सध्या सर्वांत मोठे आव्हान हे ‘खंडणी’चे आहे. सामाजिक कार्याच्या नावाखाली वस्तू रूपाने किंवा अन्य स्वरूपात काहीतरी मागणी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि कंपन्यांशी समन्वय राखून प्रतिबंधात्मक व्यवस्था निर्माण केली पाहिजे. शहरी संस्थांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण दिले, तर त्यांना आयटी क्षेत्रात येणे सोपे जाईल.
- निरंजन फडके, डिलिव्हरी हेड, इन्वासिस्टिम्स

प्रत्येक आयटी कंपनीला ‘मार्केटिंग आणि पोझिशनिंग’वर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर महत्त्वाचा ठरणार आहे. ‘बी२बी’ सोशल मीडिया मार्केटिंग केल्यामुळे ‘मार्केटिंग आणि सेल्स इंटिग्रेशन’ साध्य करता येते. उत्पादनाविषयी सकारात्मक मत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावरील ‘कंटेंट’ हेच महत्त्वाचे अस्त्र कंपन्यांकडे असेल.
- राधा गिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मीडास टच कन्सल्टंट्‌स

शहरातील वाहतूक व्यवस्था मोडकळीस आल्याने आयटी उद्योग शहराबाहेर चालले आहेत. ‘मगरपट्टा मॉडेल’प्रमाणे कार्यालय आणि निवासी इमारती एकाच ठिकाणी असलेले प्रकल्प यापुढे निर्माण करण्याची गरज आहे. ‘ऑटोमेशन’मुळे आता नोकऱ्याही कमी होत आहेत, त्यामुळे अशा कंपन्यांनी स्थानिक पातळीवरील स्टार्ट अप्स विकत घेऊन (हब अँड स्पोक मॉडेल) विस्तार केला पाहिजे.
- दीपक शिकारपूर, आयटी तज्ज्ञ 

आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना स्वतःच्या ‘इनोव्हेशन’च्या आधारे कंपनी सुरू करावी, असे वाटते. त्यांना मदत करण्यासाठी आयटी कंपन्यांनी ‘स्टार्ट अप इनक्‍युबेशन सेंटर’ स्थापन करणे आवश्‍यक आहे. स्थानिक उद्योजकांनीही त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आयटी प्रोफेशनल्सचा यात सहभाग वाढला पाहिजे. आयटी हब असलेल्या पुण्यामध्ये तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी चळवळ उभारली पाहिजे.
- अजित हट्टी, संशोधन प्रमुख, ‘पायटू’

पुढील काळात आयटी क्षेत्राचा शहर केंद्रित विकास होणार नाही, त्यामुळे बड्या आयटी कंपन्यांनीही ‘ऑफशोरिंग’ मॉडेल सोडून स्टार्ट अप आणि स्थानिक उद्योगांना पूरक असे विकेंद्रित मॉडेल राबविल्यास त्यांना यश येईल. शहर सोडून लगतच्या छोट्या गावांमध्ये जाणे आणि तेथील समस्या सोडविणे हेच आयटी क्षेत्राच्या विकासासाठी भविष्यातील सूत्र आहे.
- गीरेंद्र कसमाळकर, संस्थापक, ‘आयडियाज टू इम्पॅक्‍ट’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.