पुणे : ऑनलाइन शाळा सुरू होऊन तब्बल पंधरा दिवस उलटल्यानंतर समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या वतीने अभियानांतर्गत मोफत दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांच्या वितरणास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते गुरुवारी बालभारती येथे सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप देणार असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. (commencement of distribution of free textbooks in the presence of the minister of education)
बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांची छपाई वेळेत होऊ न शकल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. शाळेच्या पहिल्या दिवसांपासून आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाविना शिक्षणाला सुरवात केली आहे. काही ठिकाणी जुन्या पाठ्यपुस्तकांचा आधार घेतला जात आहे. परंतु पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना आल्यानंतर छपाईच्या कामाला वेग आला आणि अखेर जुलैच्या पहिल्या दिवसापासून मोफत पाठ्यपुस्तकांच्या पुरवठ्यास सुरवात करण्यात आली. याची सुरवात शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ‘बालभारती’चे संचालक दिनकर पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, ‘बालभारती’चे नियंत्रक विवेक गोसावी आदी उपस्थित होते.
शासनाच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. यावर्षी पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी आवश्यक असणाऱ्या कागदासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे पुस्तक छपाईस विलंब झाला होता. संबंधित न्यायालयीन प्रकरण निकालात निघाल्याने आता पुस्तक छपाई व पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे. प्रथम टप्प्यात राज्याच्या दुर्गम भागात पुस्तकांचे वितरण होणार आहे. उर्वरित ठिकाणी देखील लवकरच पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील. तसेच इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व पुस्तकांच्या पीडीएफ फाइल बालभारतीच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी ७८ लाख पुस्तके डाऊनलोड झाली आहेत.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.