सोमेश्वरनगर : श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान (ता. बारामती) येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सोमेश्वराच्या पिंडीस आकर्षक पुष्पसजावट करून महाभिषेक घालण्यात आला. दरम्यान, दिवसभरात काही हजार भाविकांनी प्रवेशद्वारातूनच कळसाचे दर्शन घेतले.
सोमेश्वर देवस्थान येथे मध्यरात्री मानाच्या महाभिषेकाचा मान पुजारी विनोद व अनिता भांडवलकर या दाम्पत्याला देण्यात आला. याप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर, सचिव राहुल भांडवलकर उपस्थित होते. दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलिसांच्या बंदोबस्तामुळे भाविकांना मंदिराच्या आवरात प्रवेश करता आला नाही. परंतु, दिवसभर हजारो भाविकांनी प्रवेशद्वारातूनच कळसाचे दर्शन घेतले. भाविकांची संख्या अचानक वाढल्याने पोलिसांवर ताण आला होता. त्यामुळे पुढील सोमवारी बंदोबस्तात वाढ करावी लागणार आहे. दरम्यान, ऐन श्रावणी सोमवारी देवाचा गाभारा मोकळा पडल्याचे दृश्य इतिहासात प्रथमच पाहायला मिळत होते. भाविक कळसाचे दर्शन घेताना ‘सोमाया महाराजा कोरोना हटू दे, चांगला पाऊस पडू दे’ असे साकडे घालत होते.
कपर्दिकेश्वर मंदिरात तीन पिंडी
येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या तीन कलात्मक पिंडी तयार करून परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी पार पाडले. याबाबत श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी माहिती दिली की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासन नियमाचे पालन करत तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे परंपरेनुसार श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या तीन पिंडी तयार करून महाअभिषेक, आरती, पूजा असे सर्व धार्मिक विधी देवस्थान ट्रस्टकडून पार पाडले. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेपासूनच कपर्दिकेश्वर मंदिर मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, जुन्नर तालुका भाजपचे अध्यक्ष व ओतूरचे माजी सरपंच संतोष तांबे यांनी चौथ्या श्रावणी सोमवारी तरी सर्व शिव मंदिरे शिवभक्तांना कोरोनाच्या नियमांचे पालन करून दर्शनासाठी सरकारने खुली करावी, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.