लसवंतांनो, संकट टळलेले नाही...

लसीकरणात आपण मोठी आघाडी घेतल्याबद्दल सरकारची आणि महापालिकेची प्रशंसा होत आहे. ही कामगिरी लक्षणीय असली, तरी आता सर्वांनी पूर्णतः निश्‍चिंत व्हावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काय
vaccine
vaccinesakal media
Updated on

नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे शंभर कोटी डोस देऊन देशाने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. त्याच वेळेला पुण्यातही पन्नास लाख डोस दिल्याची नोंद झाली. या प्रकारे लसीकरणात आपण मोठी आघाडी घेतल्याबद्दल सरकारची आणि महापालिकेची प्रशंसा होत आहे. ही कामगिरी लक्षणीय असली, तरी आता सर्वांनी पूर्णतः निश्‍चिंत व्हावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काय?..

‘कोव्हिशिल्ड’ असो वा ‘कोव्हॅक्सिन’, यांपैकी कोणत्याही एका लशीचे दोन डोस घेतल्यानंतरच तिची शंभर टक्के परिणामकारता दिसून येते. (रशियाची ‘स्पुटनिक’ लस देशात उपलब्ध असली तरी तिला अगदी मर्यादित प्रतिसाद मिळाला आहे.) शंभर कोटी डोस, हा आकडा प्रचंड मोठा वाटतो. मात्र, त्यांत दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या जेमतेम २९ कोटी आहे. देशातील सर्व लोकांचे लसीकरण करण्यासाठी २६० कोटी डोसची गरज आहे. अद्याप आपले निम्मेही उद्दिष्ट साध्य झालेले नाही. (पुण्यात आणखी १२ लाख डोस लागणार आहेत.) यावरून, आपल्याला पुढे किती मोठा पल्ला गाठायचा आहे, याची कल्पना येते.

नियमांची ऐशीतैशी

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या काही महिन्यांपूर्वी देशात सर्वाधिक होती. आता नवीन रुग्णांची संख्या आणि मृत्युदर हे दोन्ही आटोक्यात आले आहेत. अलीकडे काही दिवशी शून्य मृत्यूची नोंद झाली. हे चित्र खचितच दिलासादायक आहे; पण म्हणून कोरोना जणू नष्ट झाला आहे, अशा आविर्भावात गाफील राहणे जोखमीचे ठरू शकते. शहरात बव्हंशी सार्वजनिक ठिकाणी हल्ली ‘सोशल डिस्टन्स’ पाळले जात नाही, बाजारातील गर्दीत सगळे नियम पायदळी तुडविले जात आहेत, हे सार्वत्रिक चित्र असूनही कोरोना निष्प्रभ होत आहे, ही केवळ निसर्गाची कृपा म्हणावी लागेल!

चीनचे उदाहरण

कोविड विषाणूचा प्रसार चीनमधून झाला. त्या देशाने कठोर उपाय योजून तो नियंत्रणात आणला आणि जगात सर्वांत आधी तेथील व्यवहार पूर्ववत सुरू झाले. आज त्याच ठिकाणी या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यातून टाळेबंदी, व्यवहारांवर निर्बंध, विमान उड्डाणांना बंदी, असे जाचक वाटणारे निर्णय तेथील सरकारने काही ठरावीक भागांसाठी घेतले आहेत. यातून आपण धडा घेतला पाहिजे. पुण्यात मास्कसंदर्भातील कारवाई आता थंडावली आहे, ‘सोशल डिस्टन्स’साठी आग्रह धरला जात नाही, सॅनिटायजरचा वापर रोडावला आहे... कोरोना विरोधातील लढाईत प्राथमिक यश मिळविल्यानंतर आलेली ही ढिलाई चिंताजनक आहे.

पर्यटनाचे बेत

दिवाळीनंतर सुटीवर जाण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. राज्यातील सर्वच पर्यटनस्थळांवरील ‘एमटीडीसी’ची आणि खासगी रिसॉर्ट आगामी काही दिवस ‘फुल्ल’ झाल्याचे सांगितले जाते. सुमारे दीड-पावणेदोन वर्षानंतर घराबाहेर पर्यटनासाठी मुक्त फिरण्याचे स्वातंत्र्य मिळत असल्याने ही गर्दी होणे स्वाभाविक आहे. मात्र, कोणत्याही ठिकाणी गेले, तरी तेथे राज्याच्या-देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेली मंडळीही असणार. त्यांतील कोणी कोरोना विषाणूचा वाहकही असू शकतो. फिरण्याचा आनंद घेताना, ही शक्यता कायम लक्षात ठेऊन जागरूकतेने वागले पाहिजे. अन्यथा पश्‍चात्तापाची वेळ येऊ शकते.

लस घेऊनही कोरोना..

लशीचा एक किंवा दोन डोस घेऊनही कोरोनाचा संसर्ग झाला, अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. मुळात, लस घेतली म्हणजे संसर्ग होणारच नाही, हा समज चुकीचा आहे. लसीकरणानंतर बाधा झालीच, तर लशीमुळे मिळालेल्या रोगसंरक्षक कवचामुळे संबंधित रुग्णावर गंभीर परिस्थितीला तोंड देण्याची वेळ सहसा येत नाही, ही यातील जमेची बाजू आहे. मास्क, बाहेर वावरताना एकमेकांत सुरक्षित अंतर, स्वच्छता आदी कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम लस घेतल्यानंतरही पाळावेच लागणार आहेत. मात्र, अनेक जण याबाबत बेफिकीर दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.