पुणे - शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनासंदर्भात मार्गदर्शक नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यात संचारबंदी नसून, जमावबंदी आहे. सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार असून, लसीकरण प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. लग्न समारंभ तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागासह इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर हा मुख्य पर्याय आहे. लग्न समारंभात किंवा गर्दीच्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागातील हॉटस्पॉटमध्ये सध्या अकराशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात लग्न आणि ग्रामपंचायत निवडणुकीतून याचा संसर्ग वाढला आहे का, यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्यात येणार आहे.
लसीकरणावर भर
जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात एक लाख 13 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे अपेक्षित होते. त्यापैकी 60 हजार (56 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तसेच, फ्रंटलाईन वर्कर्समधील 84 हजार पोलिस, सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे त्यापैकी सात हजार कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असून, ते वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
शिवजयंतीसाठी शंभर जणांना परवानगी
शिवनेरी येथील शिवजयंती महोत्सव राज्य सरकारच्या सूचनेनुसार साध्या पद्धतीनेच साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शंभर व्यक्तींनाच परवानगी राहणार असून, संबंधितांना पासेस देण्यात आले आहेत.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.