पौड : कोरोना महामारीचा सामना करताना डॉक्टरांच्या सेवेकडे देवदूत म्हणून पाहिले जाते. परंतु लवळेफाटा (ता.मुळशी)
येथील मुळशी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि दक्षताहीन कारभारामुळे पौड येथील एका सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला. एवढेच नव्हे तर कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आपल्या वडिलांचा अंत्यविधीही मुलांनाच करण्याची वेळ आली.
एकीकडे सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण खाजगी रूग्णालयाने दाखल करू नये अशा आरोग्य प्रशासनाच्या सूचना असतानाही मुळशी हॉस्पिटल मुळशीकरांच्या जीवाशी खेळत आहे. कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतरही हॉस्पिटल चालू ठेवण्याचा मुजोरपणा येथील डॉक्टरांनी केल्याने मुळशीकरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. पौडच्या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला 10 जुलैला मुळशी हॉस्पिटलमध्ये मुलाने दाखल केले. एक्सरेमध्ये न्युमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे होते. तसे न करता त्यांना आयसीयूमध्ये ठेवले. त्यांची प्रकृती खालावल्याने 15 जुलैला स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. मात्र, 16 जुलैला पहाटे त्यांचा मृत्यू झाला. परंतु कोरोनाचा अहवाल न आल्याने पहाटे 4 ते दुपारी 2 पर्यंत मृतदेह हॉस्पिटलमध्ये तसाच पडून होता. हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांकडे बिलाचा तगादा लावला. मुलांनीही हातऊसने पैसे घेऊन हॉस्पिटलचे एक लाख वीस हजाराचे बिल भरले.
पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला याबाबत माहिती देऊनही त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही. दुसरीकडे बिलाचे पैसे
मिळाल्याने हॉस्पिटलमधील डॉक्टर मृतदेह हलविण्यासाठी मुलांकडे घाई करीत होते. रूग्ण कोरोनाबाधित असल्याने डॉक्टरांनी कर्मचाऱ्याच्या मदतीने मृतदेह प्लॅस्टिकमध्ये सीलबंद करून मुलांच्या ताब्यात दिला. सरकारी रूग्णवाहिका न आल्याने मुलांनी तीन हजार रूपयात खाजगी रूग्णवाहिका मिळविली. स्वतःच्या खर्चाने 3 पीपीई किट विकत घेतले. दोन्ही मुलांनी आणि रूग्णवाहिका चालकाने ते अंगावर चढविले. तत्पूर्वी पौडमधील युवकांनी स्मशानभूमीत अत्यंविधीची तयारी केली होती. मुलांनीच वडिलांचा मृतदेह रूग्णवाहिकेत ठेवला. पौडमध्ये स्मशानभूमीत
अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
17 जुलैला या मयत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तरीदेखील सरकारी यंत्रणेचे डोळे उघडलेले नव्हते. कोरोना
पॉझिटिव्ह रूग्ण मयत झालेला असतानाही हॉस्पिटलचे कामकाज चालूच होते. पेशंटची वर्दळ सुरूच होती. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हा संघटिका स्वाती ढमाले हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यांनी डॉक्टरांना हॉस्पिटल बंद करण्यास सांगून कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून त्यांना क्वारंटाईन करण्याची विनंती केली. तेवढ्या वेळापुरता टाळा लागला. परंतु ढमाले पाठमोऱ्या होताच पुन्हा हॉस्पिटलचे
कामकाज सुरू झाले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अजित कारंजकर यांनीही हॉस्पिटल सील करण्याची सूचना केली. तेव्हाही थोडावेळ हॉस्पिटल बंद ठेवले. पुन्हा रुग्णांची ये-जा सुरू झाली. याबाबत पत्रकारांनी डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनाही मुजोरपणे कायद्याची भाषा शिकवू लागले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
डॉ.कारंजकर यांनी तालुक्यातील सर्व खाजगी रूग्णालयांना सर्दी, खोकला, तापाचा रूग्ण आढळल्यास त्यास सरकारी रूग्णालयात
पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोरोना संशयित रूग्ण आढळल्याने घोटवडे फाट्यावरील तीन रूग्णालये चौदा दिवस सील केली होती. मग मुळशी हॉस्पिटलवर एवढी मेहरबानी कुणाची हाच प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
कोरोनाबाधित रूग्णाला औषधोपचार करताना येथील नर्स तसेच
इतर कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम डॉक्टरांनी केले आहे. या काळात इतर गावातील कितीतरी रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आले असतील त्यांना जर कोरोनाची बाधा झाली तर त्यास मुळशी स्पेशालिटी हॉस्पिटलला जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी मुळशीकर जनतेने केली आहे.
हॉस्पिटल तीन दिवसांसाठी सील केले आहे. कोरोनाबाधित संपर्कातील लोकांना चौदा दिवस क्वारंटाईन केले आहे. या हॉस्पिटलबाबत लेखी तक्रार आल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याची चौकशी केली जाईल.
- डॉ.अजित कारंजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुळशी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.