लोणावळा : लोणावळा-अँबी व्हॅल्ली रस्त्यावर सिंहगड महाविद्यालयातील युवक-युवतीचा खून करण्यात आला. लोणावळ्याजवळील आयएनएस एस कॉर्नरजवळील निर्जनस्थळी सोमवारी दुपारी दोन्ही मृतदेह आढळले.
सार्थक दिलीप वाकचौरे (वय 22, रा. राहुरी, अहमदनगर) व श्रुती संजय डुंबरे (वय 21, रा. ओतूर, जुन्नर) असे खून झालेल्या महाविद्यालयीन युवक-युवतीचे नाव आहे. ते दोघेही लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेत होते. सार्थक मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात; तर श्रुती संगणक शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक व श्रुती हे चांगले मित्र होते. श्रुती महाविद्यालयातील वसतिगृहात; तर सार्थक भाड्याने खोली घेऊन बाहेर राहत होता. ते दोघेही रविवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. घटनास्थळी सार्थकची मोटारसायकल (एमएच 17 एयू 5150) आढळून आली. सोमवारी दुपारी अडीच ते तीनदरम्यान सरपण गोळा करणाऱ्या एका व्यक्तीला युवक-युवतीचे मृतदेह आढळले. त्याने घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगुळकर यांना दिली. इंगुळकर यांनी या घटनेची माहिती लोणावळा शहर पोलिसांना दिली. दोघांच्या डोक्यात दगड व कठीण वस्तूने प्रहार केले आहेत. मृतदेह विवस्रवस्थेत असून, मुलीचे तोंड व हात कपड्यांनी बांधलेले होते. घटनेची माहिती समजताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक एम. सुवेझ हक, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. शिवथरे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने लोणावळा परिसर हादरला असून, महाविद्यालयात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच दोघांच्या मित्रांनी घटनास्थळी व लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. घटनेविषयी सार्थक व श्रुतीच्या मित्रांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
|