पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॉटेल व्यवसायावर बंदी असली तरी पुणे आणि पिंपरीतील काही व्यावसायिकांनी हॉटेलमध्येच "कोविड केअर सेंटर' सुरू केली आहेत. या माध्यमातून हे हॉटेलचालक रुग्णसेवा करीत आहेत. त्यासाठी प्रती दिन दोन ते अडीच हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यासाठी परवानगी दिली आहे, तर पुणे महापालिकेत परवानगीबाबत विचार सुरू आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना "होम क्वारंटाइन'चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे; परंतु ज्या रुग्णांचे घर लहान आहे, त्यांना कोविड सेंटरशिवाय पर्याय नाही. या परिस्थितीतून पिंपरी-चिंचवड महापालिकेने मार्ग काढला आहे. हॉटेल चालकांना "कोविड केअर सेंटर' सुरू करण्यासाठी महापालिकेने त्यांना सहा ठिकाणी परवानगी दिली आहे. त्यासाठी नियमावलीही तयार केली आहे.
वाकड परिसरातील एका सेंटरमध्ये "सकाळ'च्या प्रतिनिधीने चौकशी केली असता, प्रती व्यक्ती रोज दोन हजार रुपये शुल्क आकारले जाते. कुटुंबातील दोन व्यक्ती असतील, तर 2800 ते तीन हजार रुपये प्रती दिन दर आहेत. त्यात दोन वेळचा चहा, दोन वेळचे जेवण, दोन वेळा न्याहारी, इंटरनेट, गरम पाणी, टीव्ही आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सात किंवा 14 दिवसांचे पॅकेज घेतले तर दरात काही सवलत दिली जाते, असे सांगण्यात आले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
""आमच्या हॉटेलमध्ये "कोविड केअर सेंटर' सुरू करण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली आहे. या सेंटरमध्ये "होम क्वारंटाइन'नचा शिक्का असलेल्या रुग्णांनाच प्रवेश दिला जातो. त्यासाठी त्यांच्या कोरोना टेस्टचा अहवाल तसेच डॉक्टरांचे पत्र लागते. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांनाच येथे प्रवेश दिला जातो,'' असे त्यांनी सांगितले. येथे दाखल झालेल्या रुग्णाने त्यांच्या डॉक्टरांशी नियमित संपर्क ठेवून औषधे घ्यायची आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एरवी हॉटेलच्या रूम असतात, त्याच धर्तीवर हे सेंटर उभारण्यात आले असून, निर्जंतुकीकरणावर भर दिला जातो, असे एका हॉटेलच्या प्रतिनिधीने सांगितले.
खासगी "कोविड केअर सेंटर' सुरू व्हावीत, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. ही चांगली बाब आहे. महापालिकेला या पुढील बेड्स वाढवावे लागतील. इतकेच नव्हे तर, त्या प्रमाणात डॉक्टरांचीही संख्या वाढविणे गरजेचे आहे. तसेच मुंबईच्या धर्तीवर सेट-अप उभारणे गरजेचे आहे.
डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र
शहरात सहा ठिकाणी खासगी कोविड सेंटरला परवानगी दिली आहे. त्यासाठी महापालिकेने केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करणे त्यांना बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई होते. नागरिकांना परवडतील, असे दर आकारण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.
- डॉ. पवन साळवे, आरोग्य अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
पुणे शहरात खासगी कोविड केअर सेंटरला परवानगी दिलेली नाही. काही संस्था व ट्रस्ट यांच्याबरोबर खासगी व सार्वजनिक भागीदारीवर (पीपीपी) सेंटर सुरू करण्याबाबत महापालिकेची चर्चा सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच आरोग्य विभागाकडून घेतला जाईल.
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.