Shikrapur Crime : सावकारांच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने संपविले जीवन; ११ जणांवर गुन्हे दाखल

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील किराणा व्यावसायिक किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८) यांनी तब्बल ११ सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.
Kiran Kulkarni
Kiran Kulkarnisakal
Updated on

शिक्रापूर - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील किराणा व्यावसायिक किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८) यांनी तब्बल ११ सावकारांच्या जाचाला कंटाळून नुकतीच आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, वाडागाव, लोणीकंद, वाघोली आणि जातेगाव खुर्द येथील सर्व सावकारांची नावे लिहून त्यांचा प्रत्येकाचा व्याजाचा दरही लिहून ठेवला आहे. त्यामुळे या सर्वांना अटक करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी एक पोलिस पथकच तैनात केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिल की, कोरेगाव भीमा येथे गेली कित्येक वर्षे किराणा व्यावसायिक म्हणून किरण सुरेश कुलकर्णी हे आपले दोन भाऊ, आई-वडील यांच्यासमवेत ‘वैष्णवी सुपर मार्केट’ या नावाने दुकान चालवीत होते. कोरोना काळात हा व्यवसाय अडचणीत आल्याने कुलकर्णी यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. एकाचे व्याज देण्यासाठी दुसऱ्याकडून कर्ज घ्यायला त्यांना लागल्याने त्यांच्या सावकारांची संख्याच तब्बल ११ एवढी झाली होती.

गेल्या काही दिवसांत हे सर्व खासगी सावकार किरण यांना प्रचंड मानसिक त्रास देत होते. पुढील काळात त्यांनी सुधाकर ढेरंगे व कांतिलाल ढेरंगे यांच्यासोबत कोरेगाव येथे भागीदारीत एक इमारत बांधलेली होती. अशातच या सर्व सावकारांच्या तगाद्यामुळे ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळे विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

मात्र, या सदनिका व गाळ्यांना ग्राहक आले की, ढेरंगे हे त्या ग्राहकांना इमारत वा गाळे घेऊ देत नव्हते. अशा परिस्थितीत चोहोबाजूनी आर्थिक व मानसिक कोंडीचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी अखेर गुरुवारी (ता. ११) न्हावी सांडस (ता. शिरूर) येथील भीमा नदीत उडी मारून आत्महत्या केली.

त्यांना त्रास देणाऱ्या सर्व खासगी सावकारांची नावे, त्यांनी आकारलेला व्याजदर आदी मजकुराची एक चिठ्ठी नदीकाठी सापडल्याने शिक्रापूर पोलिसांनी त्यांचे बंधू महेश कुलकर्णी (रा. कोरेगाव) यांच्या फिर्यादीनुसार, नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे (तिघेही रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर), सुधाकर ढेरंगे, कांतिलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे (तिघेही रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर), शांताराम सावंत (रा. वाडागाव, ता. शिरूर), अजय यादव, जनार्दन वाळुंज (रा. लोणीकंद, ता. हवेली), जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील माजी सरपंच किशोर खळदकर, मामा सातव (रा. वाघोली) यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

खासगी सावकारकीच्या अनुषंगाने सर्व पुराव्यांचे संकलन पोलिसांनी सुरू केले आहे. या सर्वांना तत्काळ अटक करण्यासाठी पाच पोलिसांची एक तपास पथक तयार करून या सर्वांच्या अटकेसाठी रवाना केल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली. दरम्यान, या ११ आरोपींपैकी काहींवर व्याजासाठी त्रास दिल्याने शिक्रापूर पोलिसांकडेच गुन्हे दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.