Cyber Crime : सायबर गुन्हेगारांचे ‘ऑनलाइन टास्क’ महागात; नागरिकांची १९ कोटींची फसवणूक

‘मला ‘वर्क फ्रॉम होम’साठी टेलिग्रामवर ग्रुप जॉईन करा, असा मेसेज व्हॉटस॒ॲपवर आला. त्यावरील लिंक क्लिक करून ग्रुप जॉईन झाले.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

पुणे - ‘मला ‘वर्क फ्रॉम होम’साठी टेलिग्रामवर ग्रुप जॉईन करा, असा मेसेज व्हॉटस॒ॲपवर आला. त्यावरील लिंक क्लिक करून ग्रुप जॉईन झाले. यूट्यूबरील व्हिडिओला लाइक करून स्क्रीन शॉट पाठविल्यास पैसे मिळतील, असे त्यात म्हटले होते. त्यानुसार स्क्रीन शॉट पाठविले.

लगेचच बॅंक खात्यात दोन-तीन हजार रुपयेही जमा झाले. त्यानंतर तुमचे तीन फ्री टास्क संपले असून पेड टास्कसाठी पैसे गुंतवावे लागतील, असा मेसेज आला. त्यानुसार काही रक्कम गुंतवली. पुन्हा ग्रुप टास्कमध्ये जादा पैसे मिळतील, असा मेसेज आला. लालसेपोटी आणखी रक्कम गुंतवली.

परंतु टास्कमध्ये त्रुटी राहिल्याने पैसे मिळणार नाहीत. ते परत मिळवायचे असतील तर पुन्हा रक्कम गुंतवावी लागेल, असे सांगून आत्तापर्यंत अडीच लाख रुपये उकळले,’’ अशा प्रकारे ‘ऑनलाइन टास्क’मध्ये फसवणूक झालेल्या स्मिता देशमुख (नाव बदलले आहे) यांनी त्यांच्यासमवेत घडलेला प्रकार सांगितला.

सायबर गुन्हे शाखेकडून प्राप्त माहितीनुसार, शहरात गेल्या आठ महिन्यांत ‘ऑनलाइन टास्क’ फसवणुकीबाबत १८७ नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारदारांची १९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

शहरात ‘एमएसईबी’चे बिल थकीत असल्याबाबत लिंक पाठवून पैसे न भरल्यास वीज कनेक्शन तोडू, असा मेसेज पाठवून पैसे उकळल्याच्या घटना घडत होत्या. ऑनलाइन ‘सेक्स्टॉर्शन’करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुरू आहेत.

परंतु ‘एमएसईबी’, ‘सेक्स्टॉर्शन’च्या घटनांच्या तुलनेत सध्या ‘ऑनलाइन टास्क’ फसवणुकीचा ट्रेंड वाढला आहे. यूट्यूबरील व्हिडिओला लाइक करून स्क्रीन शॉट पाठविल्यास पैसे मिळतील. तसेच, गुगलवर कंपनीला रिव्ह्यू दिल्यास बॅंक खात्यात पैसे जमा होतील, असे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडण्याच्या घटना घडत आहेत. ऑनलाइन फसवणूक होणाऱ्या घटनांमध्ये सुशिक्षित नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.

दरम्यान, ‘काही नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. तर काही तक्रारी अर्जांबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी,’ असे आवाहन आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी केले आहे.

काय खबरदारी घ्याल...

  • लाइक किंवा रिव्ह्यू देण्यापूर्वी गुगलवर सर्च करून कंपनीची माहिती घ्या.

  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

  • अपरिचित व्यक्तीच्या मेसेजला उत्तर देवू नका

  • कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

  • सायबर गुन्हेगारांकडून टेलिग्रामचा वापर सर्वाधिक, त्यामुळे जरा जपूनच...

मार्चपासून ‘ऑनलाइन टास्क’द्वारे नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. घरबसल्या लाइक करून किंवा रिव्ह्यू देवून कोणी पैसे देत नाही. रिव्ह्यू देण्यापूर्वी संबंधित कंपनीबाबत पडताळणी करावी. नागरिकांनी आमिषाला बळी पडू नये.

- मीनल सुपे पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पुणे सायबर पोलिस ठाणे.

ऑनलाइन टास्क फसवणुकीच्या घटना (जानेवारी ते ऑगस्ट २०२३) -

- सायबर गुन्हे शाखेकडे प्राप्त तक्रारी १८७

- फसवणूक झालेली रक्कम १९ कोटी १० लाख ५४ हजार रुपये

- दाखल गुन्हे ५५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.