Cyber Crime : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६४ कोटींची फसवणूक

कॅम्प भागातील ५२ वर्षीय सचिन यांना एका स्टॉक प्रमोशन नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ॲडमिनकडून कॉल आला.
Cyber Crime
Cyber Crimesakal
Updated on

पुणे - कॅम्प भागातील ५२ वर्षीय सचिन यांना एका स्टॉक प्रमोशन नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ॲडमिनकडून कॉल आला. डेली शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष सचिन यांना दाखवले. सचिन यांनी आमिषाला बळी पडून शेअर्समध्ये फेब्रुवारी ते मे या कालावधीत स्टॉक प्रमोशन ग्रुपच्या माध्यमातून ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली. परंतु ज्यादा परतावा तर दूरच, मुद्दलही गेली. याबाबत लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे शहरात शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२४ मध्ये एक जानेवारी ते १५ मे या साडेचार महिन्यांत शेअर ट्रेडिंगमध्ये ४५९ नागरिकांची तब्बल ६४ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कशामुळे होते फसवणूक

काही नागरिक शेअर्स खरेदी करताना ज्यादा पैशांच्या आमिषाला बळी पडून सेबीकडे नोंदणीकृत नसलेल्या बोगस कंपन्या आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, टेलिग्रामच्या माध्यमातून पाठवलेली लिंक डाउनलोड करून शेअर ट्रेडिंग करतात. तसेच शेअर ट्रेडिंग करताना कंपनीबाबत पुरेशी माहिती घेत नाहीत आणि तेथेच अनेकांची फसवणूक होते.

फसवणूक झालेली रक्कम परत मिळवा

शेअर ट्रेडिंगमध्ये किंवा कोणत्याही सायबर गुन्ह्यात आर्थिक फसवणूक झाली असेल तर तातडीने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाणे किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तातडीने तक्रार द्या. तुमच्या खात्यातून चोरट्यांच्या खात्यात गेलेली रक्कम परत मिळवण्यासाठी सायबर पोलिस संबंधित बँकेला सांगून ते खाते गोठवण्याचे प्रयत्न करतात. ते बँक खाते गोठवल्यानंतर पोलिसांकडून न्यायालयात रक्कम परत मिळण्याबाबत अर्ज केला जातो. न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतात.

लिंक डाउनलोड करू नका

  • शेअर ट्रेडिंगमध्ये लगेचच कोणीही दुप्पट-तिप्पट परतावा देत नाही, ही बाब कटाक्षाने लक्षात घ्या.

  • कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका.

  • शेअर ट्रेडिंग करताना संबंधित कंपनी सेबीकडे नोंदणीकृत आहे का, याची खात्री करावी.

  • सेबीकडे नोंदणीकृत शेअर ब्रोकरच्या माध्यमातूनच व्यवहार करा.

  • कोणत्याही सोशल मीडियाच्या ग्रुप किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंक डाउनलोड करू नका.

- विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा, पुणे

फसवणूक झाल्यास काय करावे

https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आणि पोलिस ठाण्यात तातडीने तक्रार नोंदवा.

हेल्पलाइन क्रमांक - १९३०

शेअर बाजारातील सर्व खरेदी-विक्री नेहमी डी-मॅट खात्यामार्फतच होते. डी-मॅट खाते नाही म्हणजे गडबड आहे, हे लक्षात ठेवा. कोणतेही खाते लगेच उघडत नाही. ब्रोकरेज कंपनी, बँक, वेल्थ मॅनेजमेंट कंपनी यांची कागदपत्रे तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका. चूक झाल्याचे लक्षात आल्यास थांबा. पुन्हा त्याच चुका करू नका. आर्थिक गुंतवणूक करताना समोरची व्यक्ती ‘सेबी’ अधिकृत व्यक्ती आहे का, हे ‘सेबी’च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासा.

- सीए. शिरीष देशपांडे, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक

अनोळखी व्यक्तीशी गुंतवणुकीचे व्यवहार करू नयेत. शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी आलेल्या फोन किंवा ई-मेलला प्रतिसाद देऊ नये. शेअर बाजारात रोखीने व्यवहार होत नाहीत. शेअर बाजार आणि फिक्स परतावा हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. या फिक्स परताव्याच्या आमिषामुळेच लोकांची फसवणूक होते. जे कोणी फिक्स परतावा सांगतील, अशा लोकांना कटाक्षाने टाळा. नामांकित आणि परिचित ब्रोकरकडेच शेअरचे व्यवहार करावेत.

- श्रीनिवास जाखोटिया, गुंतवणूक तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.