Leopard Attacks : बिबट्याच्या हल्ल्यात दहिवडीत मुलाचा बळी?

येथील देवमळा परिसरातील उसाच्या शेतात आज (ता. २१) सायंकाळच्या सुमारास छिन्नविछिन्न अवस्थेतील शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
Leopard Attacks
Leopard Attackssakal

शिरूर दहिवडी (ता. शिरूर) : येथील देवमळा परिसरातील उसाच्या शेतात आज (ता. २१) सायंकाळच्या सुमारास छिन्नविछिन्न अवस्थेतील शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. बिबट्याने हल्ला करून या मुलाला ठार मारल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांसह घटनास्थळी जमलेल्या लोकांनी केला. मात्र, वनखात्याने अद्याप या शक्यतेला दुजोरा दिलेला नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.

यश सुरेश गायकवाड (वय ११) असे मृत मुलाचे नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तो देवमळा परिसरात आपल्या कुटुंबीयांसह राहण्यास असून, गावातीलच शाळेत शिकत होता. दुपारी घरामागे शौचास गेला असता तेथेच गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून त्याला जवळच असलेल्या उसाच्या फडात ओढून नेले.

त्या वेळी घराच्या पुढील बाजूस शेतीची कामे चालू असल्याने दहा ते पंधरा जण तेथे होते. शौचास गेलेला मुलगा बराच वेळ झाला तरी येईना म्हणून कुटुंबीयांनी घरामागे जाऊन पाहिले असता तो तेथे न दिसल्याने एकच खळबळ उडाली. यशच्या कुटुंबीयांनी व स्थानिकांनी परिसरात शोधाशोध केली.

मात्र, दाट गवत, गर्द झाडी व उसाच्या फडांमुळे त्याचा शोध लागू शकला नाही. या परिसरात बिबट्याचा वावर असून, बिबट्याने ओढून नेल्याच्या खुणादेखील घटनास्थळापासून काही अंतरावर दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, याबाबत वनखात्याला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी जगताप यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. स्थानिकांसह त्यांनी परिसरात शोध घेतला असता एका उसाच्या फडातील पाण्याच्या ओहोळात यश याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com