पुणे - सकाळी कालव्याच्या पाण्यात घर बुडाले, तर सायंकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत रात्र काढावी लागली. आज (शुक्रवारी) सकाळी चिखलात बुडालेला संसार वेचताना प्रत्येकाच्या डोळ्यांत आसवांचा पूर दाटून आला. धुणी-भांडी करून संसार चालविणाऱ्या उषा नागनाथ सरबुडे म्हणाल्या, ""साहेब, कालवा नव्हं; तर आमचं नशीब फुटलं. कष्टानं उभं केलेलं घर पुन्हा कसं उभं करू,'' अशी मन हेलावणारी कैफियत "सकाळ'शी बोलताना त्यांनी मांडली.
प्रातिनिधिक स्वरूपात ही उषाबाईंची कहाणी असली, तरी दांडेकर पूल वसाहतीमध्ये थोड्याफार फरकाने असेच चित्र होते. कुमिंदा सतीश कदम, शिता सचिन दिवटे, अच्युत भोसले या प्रत्येकाचीच गोष्ट ऐकताना मन व्याकूळ होते. वस्तीतील सगळी कुटुंबे कालव्याच्या पाण्यामुळे घरात साठलेला गाळ, वाहून गेलेले पत्रे, भांडी, कपडे शोधून जमा करत असल्याचे चित्र दिसून आले. एकीकडे चौकशीसाठी सरकारी अधिकाऱ्यांचे काम सुरू असताना, दुसरीकडे विस्कटलेला संसार सावरण्याची लगबग, असे चित्र दिवसभर वस्तीमध्ये होते. त्यांच्या मदतीला नातेवाईक धावून आल्याचे चित्र होते.
अरुंद असलेले; पण चिखल साठलेल्या वस्तीतील रस्त्यांवर सर्वांची एकच लगबग सुरू होती. पुन्हा संसाराचा गाडा कसा उभा राहील, या चिंतेत सर्वजण दिसत होते. कोणी भेटावयास आले तर काही मिळेल का, या आशेने घरातील एकजण तिथे धावत होता, तर दुसरी व्यक्ती घरातील व्यक्तींसाठी जेवणाची व्यवस्था कुठे होते याचा शोध घेत होती. सर्वच कुटुंबांतील सदस्य मोडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसत होते.
त्यापैकीच एक असलेल्या उषा यांना दोन मुले, एक मुलगी आणि जावई, नातवंडे. आठ जणांच्या संसाराचा गाडा त्या धुणी-भांडी करून हाकत होत्या. त्यांची दोन्ही मुले नववी आणि दहावी नापास, मुलगी आणि जावई सर्वजण गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास मोलमजुरीच्या कामाला गेले होते. अचानक शेजारच्या लोकांचा फोन उषाबाईंना गेला. त्यानंतर सर्वांनी हातातलं काम टाकून घराकडे धाव घेतली. दांडेकर पुलावरूनच वसाहतीमध्ये पाण्याचा लोंढा पाहिला. तेव्हा गेल्या तीस ते चाळीस वर्षांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी जमा करून कष्टाने उभे केलेले घर पाण्यात बुडताना पाहिल्यानंतर त्यांच्या आसवांचा बांध फुटला.
उषाबाई म्हणाल्या, ""नवरा आणि मी पस्तीस वर्षांपूर्वी छोट्याशा झोपडीमध्ये संसार सुरू केला. दोन मुले आणि एका मुलीला ऐपतीप्रमाणे शिक्षण दिले. कष्टाशिवाय रोजची चूल पेटत नाही, त्यामुळे सर्वांना कामाला जावेच लागते. मिळेल ते काम करून गुजराण करत होतो. कालवा फुटला आणि आमचं घर त्या पाण्यात कचरा वाहून जावा तसा वाहून गेलं. कोणाच्या चुकीमुळे कालवा फुटला; आमच्या वस्तीचा त्यात काय दोष?''
आता आम्ही आमची जागा सोडणार नाही..
कालव्याची भिंत खचून पाण्याच्या प्रवाहामुळे आमचं राहतं घर वाहून गेलं. आमच्या तीन पिढ्या ज्या घरासाठी खपल्या, त्या घराची जागा आता आम्ही सोडणार नाही, असे सांगत सर्व महिला आपापल्या पडलेल्या घरांच्या जागेवर आशेने बसल्या होत्या. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला काही मदत होऊ शकेल का, अशी विचारणा करत विस्कटलेलं घर दाखवीत होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.