Purandar Airport Pune : विश्वासात घेऊन पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन - देवेंद्र फडणवीस
पुणे : शहरामध्ये १० ते १५ वर्षांपूर्वीच स्वतंत्र विमानतळ झाले असते तर येथील जीडीपी दोन टक्क्यांनी वाढला असता. पण, विमानतळाच्या कमतरतेमुळे उद्योगांना आवश्यक अशा प्रकारचे वातावरण आपण तयार करू शकलो नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पुरंदर येथील विमानतळाला केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादन केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
चांदणी चौकातील उड्डाणपूल आणि खेड-मंचर बाह्यवळण महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे,
आमदार सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, राहुल कुल, उमा खापरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘पुण्यात इलेक्ट्रॉनिक, मॅन्युफॅक्चरिंग, हॉर्टिकल्चर क्लस्टर केले जाणार आहे. त्यासाठी मालवाहतूक विमानतळ महत्त्वाचे आहे. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुढील आठवड्यात बैठक घेण्याची मागणी केली आहे. पुण्यामधून बंगळूरला गेलेले उद्योग पुन्हा येथे स्थलांतरित होण्याच्या प्रयत्नात आहेत,
त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा पुरविल्या तर गुंतवणूक आणि नोकऱ्या परत आणता येतील. पुणे मेट्रोचे ‘वन कार्ड पुणे’ योजनेचा फायदा केवळ शहरासाठी मर्यादित नसून, संपूर्ण देशभरातील मेट्रोसाठीही ते वापरता येणार आहे. चांदणी चौकाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने धोरणात्मक बदल करून निधी दिला. त्याचपद्धतीने कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी २०० कोटी रुपये दिले जाणार आहेत.’’
अजित पवार म्हणाले, ‘‘चांदणी चौकाने सर्वांनाच त्रास दिला. पुणेकरांनी सहनशीलता दाखवली. पण या कामासाठी सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणांनी पाठपुरावा केला. त्यामुळे हे काम होऊ शकले. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे.’’ या वेळी चंद्रकांत पाटील, गोऱ्हे, तापकीर यांनीही मनोगत व्यक्त केले.
चांदणी चौकाचे नाव महापालिकेच्या दप्तरी ‘एनडीए चौक’ असा असताना या पुलावर ‘चांदणी’ कोरली असल्याने त्याचे नाव ‘चांदणी चौक’ पडले, असे अजित पवारांनी सांगताना काही विशेषणे वापरली. त्यावर उपस्थितांनी खळखळून हसून दाद दिली.
फडणवीस यांनी या चौकात वाहतूक कोंडीत अडकून दिवसा चांदण्या दिसत असतील म्हणून यास ‘चांदणी चौक’ असे नाव पडले असेल अशी कोपरखळी मारली. गडकरी यांनी त्यावर या चौकाचे नाव चांदणी चौक ठेवायचे की एनडीए चौक?, हे तुम्ही दोघांनी ठरवा असा सल्ला दिला.
मेधा कुलकर्णींना पहिल्या रांगेत स्थान
उड्डाणपुलाच्या कार्यक्रमातून डावलले जात असल्याचा आरोप करत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली होती. पण, या कार्यक्रमात कुलकर्णी यांची आसनव्यवस्था पहिल्या रांगेत करण्यात आली. तसेच, गडकरी यांनी भाषणामध्ये कुलकर्णी यांनी या कामासाठी प्रयत्न केल्याचा उल्लेख केला. कार्यक्रम संपल्यानंतर नियोजित दौरा नसतानाही कुलकर्णी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
‘नाराजी मनाला पटली नाही’
‘‘या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल शुक्रवारी माजी आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. साध्या हँडबिलवर फोटो नाही हा त्यांचा आक्षेप होता. पण, याचवेळी शहरात २४० होर्डिंगवर त्यांचे फोटो होते.
साधारण नाराजी असेल तर ती अशी जाहीर व्यक्त करायची नसते. ऐन कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी असे व्यक्त होणे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला पटले नाही,’’ असे भाजपच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.
अजित पवारांची चौफेर टोलेबाजी
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौफेर टोलेबाजी केली. पत्रकारांसह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर तुटून पडून ‘‘मी स्वतंत्र बैठक घेतली तर तुमच्या पोटात का दुखतंय?, आताच विरोधी पक्षनेते झाले आणि यांना कोल्डवॉर कुठे दिसले, असा प्रश्न केला.
नागपूरच्या अगोदर पुण्याच्या मेट्रोला परवानगी दिली असती तर ती खचाखच भरून चालवली असती, असा टोला पवार यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडून अजित पवार यांच्याकडे जाणार का?,
अशी चर्चा सुरू असताना १५ आॅगस्ट रोजी ध्वजवंदन पुण्यात या दोघांपैकी कोण करणार?, अशी बातमी माध्यमांमध्ये दाखविण्यात आली. त्यावर पवार म्हणाले, ‘‘पुण्यात १५ आॅगस्टला राज्यपाल ध्वजवंदन करतात, ही परंपरा तुम्हाला माहिती नाही का?, माहिती नसताना पवार ध्वजवंदन करणार की पाटील, अशा बातम्या करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करता.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.