बारामती - कोविडकाळात लोकांचे उद्योग व्यवसाय बंदहोते, अनेकांना घर चालविणे अशक्य बनलेले होते, या काळात नगरपालिकेची घरपट्टी वेळेत न भरल्याने आकारलेल्या दंडाची रक्कम माफ करावी, अशी असंख्य बारामतीकरांची मागणी आहे. या बाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन ही रक्कम माफ करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी बारामतीकरांची मागणी आहे.
बारामती नगरपालिकेने मार्चअखेर जवळ आल्यामुळे वसूलीवर जोर दिला आहे. नगरपालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2022 अखेर बारामती नगरपालिकेची थकबाकी 21 कोटी 89 लाख रुपये इतकी आहे. या व्यतिरिक्त नगरपालिकेची चालू मागणी 16 कोटी 61 लाख रुपये इतकी आहे. एकूण नगरपालिकेस 38 कोटी 50 लाख रुपयांचे येणे आहे.
या मध्ये 31 जानेवारी 2023 पर्यंत नगरपालिकेने 9 कोटी रुपयांची वसूली केली आहे. यातही थकबाकीचा मागील दंडच निव्वळ 13 कोटी 37 लाख रुपये इतका असून चालू दंड 16 लाख 76 हजार रुपये इतका आहे.
घरपट्टीची मूळ मुद्दलाची रक्कम भरण्याची अनेकांची आजही तयारी आहे. कोविडच्या काळात लांबलेले लॉकडाऊन, व्यवसायावर झालेला विपरीत परिणाम, ठप्प झालेले अर्थकारण, अनेकांना झालेला मोठा तोटा, या पार्श्वभूमीवर दंडाची रक्कम राज्य शासनाकडून माफ होणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची भावना आहे.
हा निर्णय नगरपालिकेस त्यांच्या स्तरावर घेता येत नाही, राज्य शासनाकडून या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, त्या मुळे अजित पवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून दंडाची रक्कम माफ करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी बारामतीकरांची मागणी आहे. बारामतीतील जवळपास 46 हजार मिळकतींपैकी तब्बल 30 हजार मिळकती कोविडच्या संकटामुळे थकबाकीत आहेत, याचा शासनाने सहानुभूतीने विचार करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
दंड माफ करावा...
कोविडने सगळ्यांचेच कंबरडे मोडले आहे, शासनाने यात लवचिक धोरण ठेवत दंड माफ करावा, मुद्दल भरण्यास अनेकांची तयारी आहे. या बाबत लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे.- अँड. अमरेंद्र महाडीक, बारामती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.