पुणे - वर्षानुवर्षे विविध समस्यांचा सामना करत पोलिस ब्रिटिशकालीन पोलिस वसाहतीत राहत होते... आता कुठे त्यांचे पंचतारांकित टॉवरमध्ये राहण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले... त्यांना शिवाजीनगर येथे २२ मजली इमारतींमध्ये अत्याधुनिक सोई-सुविधायुक्त ‘टू बीएचके’ही मिळाले... परंतु, या टॉवरमध्ये पाणीच येत नसल्यामुळे पोलिसांचे टॉवरमध्ये राहण्याचे स्वप्न अधांतरीच आहे... प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तीन महिने उलटूनही या ठिकाणी अद्याप पाण्याची व्यवस्था झाली नाही. यामुळे पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गैरसोय होत आहे.
पर्सिस्टंट फाउंडेशनच्यावतीने शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाजवळील वसाहतीत पोलिसांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ‘रायगड’ व ‘शिवनेरी’ हे दोन टॉवर अडीच वर्षात उभारण्यात आले. ११ जुलै रोजी पोलिस प्रशासनाकडे या इमारतींच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. त्यानंतर पोलिस प्रशासनाने सोडत काढून या सदनिकांचे वाटप केले. परंतु, तीन महिने झाले, तरी अजूनही तेथे पाण्याची व्यवस्था झाली नसल्याने पोलिसांना तेथे राहण्यास जाता येत नसल्याची सद्यःस्थिती आहे.
नव्या इमारतींसाठी पुरेशा क्षमतेने पाणी पुरवठा उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनीची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित प्रकल्पाचे काम सुरू असतानाच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. पोलिसांकडून काही महिन्यांपूर्वी यासंदर्भात महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या जलवाहिनीसाठी निधी मंजूर केला. परंतु, फर्ग्युसन महाविद्यालय परिसरातून स्वतंत्र जलवाहिनीचे टाकण्याचे काम अद्यापही सुरू झाले नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारी याकडे गांभीर्याने पाहात नाहीत आणि महापालिकेकडूनही थंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे जलवाहिनीच्या कामात दिरंगाई होत आहे. परिणामी या सदनिकांमध्ये राहण्यासाठी जाता येत नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबाची उत्सुकताही आता मावळू लागली आहे.
इमारतींची संख्या - २
एकूण सदनिका - १६८
एका सदनिकेचे क्षेत्रफळ - ५५० चौरस फूट
लाभार्थी पोलिस - १६८
शहरातील एकूण पोलिस - ८,६००
पोलिसांच्या नवीन इमारतींसाठी महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेकडून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. येत्या आठ दिवसांत ते पूर्ण होईल.
- डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन विभाग)
अनेक अडचणींशी सामना करीत आम्ही नव्या टॉवरमध्ये घर मिळेल या अपेक्षेने पोलिस वसाहतीमध्ये राहिलो. सोडतीमध्ये आम्हाला घरही मिळाले. परंतु, तीन महिने झाले, तरी केवळ पाणी नसल्यामुळे आम्हाला या इमारतीत राहायला जाता आले नाही.
- एक पोलिस कर्मचारी
या इमारतीस पाणी पुरवठा करण्यास कुठलीही अडचण नाही. पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर तत्काळ पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न केले. फर्ग्युसन महाविद्यालय परिसरातून स्वतंत्र जलवाहिनी टाकली जात आहे. या इमारतींना लवकरच पुरेसे पाणी मिळू शकेल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, महापालिका पाणीपुरवठा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.