पुणे : ‘भारतीय खेळाडूंनी टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत बजावलेल्या चकमदार कामगिरीमुळे जगात देशाची मान उंचावली असून देशाला स्पोर्ट्स पॉवर बनविण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे.’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे केले. येथील आर्मी स्पोर्ट्स इन्टिट्यूटच्या स्टेडिअमचे ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा असे नामकरण संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लष्कराच्या तिन्ही दलातील ऑलिंपिक सहभागी खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला विशेष सेवा पुरस्काराने गौरविले. यावेळी मंत्री राजनाथसिंह बोलत होते. यावेळी लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, कर्नल आर. यादव, सुभेदार नीरज चोप्रा आदी उपस्थित होते. (Pune News)
‘‘लष्करातील खेळाडूंनी बजावलेल्या अतुलनीय कामगिरीने युवा पिढी खेळाकडे निश्चितच आकर्षित होणार आहे,’’ अशी आशा व्यक्त करत मंत्री राजनाथसिंह म्हणाले, ‘‘स्टेडियमला नीरज चोप्रा यांचे नाव देऊन खेळांडूप्रति स्नेह, सन्मान आणि आदरभाव व्यक्त होत आहे. रामायण, महाभारत काळात युद्धविद्या हा पाठ्यक्रमाचा भाग होता. तलवारबाजी, भालाफेक शिकविले जात. नालंदा, तक्षशिला विद्यापीठात त्यावेळच्या परदेशातून खेळाडू शिकायला येत असत.’’
ते म्हणाले, ‘‘खेळाडू आणि लष्कर याची परंपरा आहे. ध्यानचंद, मिल्खासिंग यांची परंपरा नीरज चोप्रा व अन्य खेळाडूंनी कायम ठेवली आहे. खेळांडूप्रमाणे त्यांना प्रशिक्षित करणारेही तितकेच कौतुकास पात्र आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरावाला जागा आणि संधी नसतानाही खेळाडूंनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. आर्मी स्पोर्ट्स इन्टिट्यूटने लॉकडाउनच्या काळात खेळांडूसाठी घेतलेली मेहनत प्रशंसनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडू आणि खेळाला विशेष प्रोत्साहन दिले आहे. त्याचेही परिणाम पदकांच्या रूपाने दिसत आहे. कोणताही खेळ केवळ पदकांसाठी नसून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासही पूरक असतात. महिलांनीही या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. पदक मिळविलेल्या खेळांडूप्रमाणे ऑलिंपिकला पात्र खेळांडूची कामगिरी अभिनंदनीय आहे. ऑलिंपिकचे यजमानपद भारताकडे येण्याच्या दृष्टिने पावले उचलली जात आहेत.’’ कार्यक्रमास लष्कराचे अधिकारी, इन्टिट्यूटचे खेळाडू, पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मेजर नंदिनी मल्होत्रा यांनी केले. इन्टिट्यूटचे कमांडर कर्नल राकेश यादव यांनी आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक
खेळाला खूप महत्त्व आहे, याचे सर्वांत चांगले उदाहरण महाराष्ट्रात आहे. शिवाचा छत्रपती शिवाजी महाराज होण्यामागे खेळ हा घटक आहे. त्यांना जिजामाता, समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिले आणि ते राष्ट्रनायक झाले.
खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन
कार्यक्रमानंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी इन्टिट्यूटमधील खेळाडूंशी संपर्क साधला. या ठिकाणी मिळत असलेल्या सुविधांची माहिती घेतली. खेळाडूंबरोबर अल्पोपहार करत त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व काही करण्यास केंद्र शासन तयार आहे. त्यासाठी आम्ही पूर्णपणे बांधील आहोत आणि याची देशातील सर्वच खेळाडूंना कल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडू आणि खेळ या दोन्हीला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. कोणतीही संस्था किंवा खेळाडू यांना वैयक्तिक स्तरावरही प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र शासनाच्यावतीने केले जात आहे. काही राज्य सरकारही त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.