शर्मिला ओसवाल यांच्या 'डिजिटल वूमन वॉरियर'चे कौतुक
पुणे - समाजाच्या तळागाळातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि त्याद्वारे आर्थिक व्यवहार करण्याचे प्रशिक्षण देण्याच्या "डिजिटल वूमन वॉरियर' या पुणेकर महिलेच्या उपक्रमाचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या उपक्रमात केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य करण्याचेही आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
बिबवेवाडीत राहणाऱ्या, ग्रीन एनर्जी फाउंडेशनच्या संचालिका शर्मिला ओसवाल यांनी राबविलेल्या या उपक्रमाची दखल पंतप्रधानांनी घेतली आहे. भाजीविक्रेत्या, सफाई कामगार, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी महिलांना त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन मोबाईल, डेबिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करण्याबाबतचे प्रशिक्षण ओसवाल यांनी प्रायोगिक स्तरावर पुणे, दिल्ली, मुंबई, चेन्नई आदी शहरांत दिले आहे. या उपक्रमांतर्गत मोबाईल दूरध्वनी, डेबिट कार्ड नसलेल्या महिलांनाही आर्थिक व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड आणि "भीम ऍप'च्या माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण कशी करता येईल, याचीही माहिती दिली जाते.
याबाबतच्या एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, अशी विनंती एका पत्राद्वारे त्यांनी पंतप्रधानांना दोन महिन्यांपूर्वी केली होती. पंतप्रधान कार्यालयातून 14 मार्च रोजी अचानक दूरध्वनी आला आणि दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांनी भेटावयास बोलविले आहे, असे सांगण्यात आले. त्यानुसार ओसवाल यांनी दिल्ली गाठली. पंतप्रधानांनी सुमारे 20 मिनिटे वेळ दिला होता. त्यात उपक्रम कसा आहे, महिलांचा प्रतिसाद कसा आहे, राष्ट्रीय स्तरावर हा उपक्रम कसा राबविता येईल, याबाबत त्यांनी ओसवाल यांच्याशी चर्चा केली. जैन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे (जीतो) आयोजित एका कार्यक्रमात या उपक्रमाची सुरवात झाली होती. त्यानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सहकार्याने पथदर्शी प्रकल्प सुरू झाले, असेही ओसवाल यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले. त्यावर पंतप्रधानांनी नीती आयोगाच्या माध्यमातून या उपक्रमाची अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबत सूतोवाच करून अंमलबजावणीसाठी एक अहवाल सादर करण्यास त्यांना सांगितले.
पंतप्रधानांच्या भेटीच्या अनुभवाबाबत ओसवाल म्हणाल्या, 'एखाद्या उपक्रमाची दखल थेट पंतप्रधान घेतात, याचेच मला मोठे अप्रूप वाटत आहे. तळागाळातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधानांची तळमळ आश्चर्यचकित करणारी होती. "डिजिटल वूमन' उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने आत्मविश्वास वाढला असून आता या उपक्रमासाठी अधिक जोमाने काम करणार आहोत.'
|